प्रभावी नियोजनामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ
By admin | Published: August 1, 2015 01:21 AM2015-08-01T01:21:58+5:302015-08-01T01:21:58+5:30
विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तनबदल घडवून आणण्याकरिता शिक्षकांनी स्वत: विकसित असणे गरजेचे आहे.
गडचिरोली : विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तनबदल घडवून आणण्याकरिता शिक्षकांनी स्वत: विकसित असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नियोजन आवश्यक आहे. प्रभावी व परिणामकारक नियोजनच शैक्षणिक गुणवत्तेला पुढे आणते, गुणवत्तेत वाढ होते, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनी केले.
पंचायत समिती अंतर्गत मुरखळा केंद्राचे पहिले केंद्र संमेलन संजीवनी उच्च प्राथमिक शाळा नवेगाव येथे गुरूवारी घेण्यात आले. यावेळी डांगे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. डी. सोनटक्के होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, संजीवनी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पोरेड्डीवार, वेणुगोपाल ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एकनाथ श्रीकोंडावार उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बेंदरे यांनी पुस्तक परिचय करून दिला. दडमल यांनी इयत्ता दुसरीच्या विषयाचा पाठ घेतला. कल्पना आकनुरवार यांनी अभ्यासाचे नियोजन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, प्रकल्प नियोजन व अंमलबजावणी यावर चर्चा घडवून आणली. रत्तो हिचामी यांनी लेखांचे वाचन केले. गौतम मेश्राम यांनी चर्चात्मक मार्गदर्शन केले. दरम्यान उद्धव डांगे, पुलखलच्या मुख्याध्यापिका कुंभारे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन प्रवीण एडलावार तर आभार रूपा शृंगारपवार यांनी मानले. यावेळी ७३ शिक्षक हजर होते. (शहर प्रतिनिधी)