वन जमिनीवर अतिक्रमण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:35 AM2021-03-19T04:35:33+5:302021-03-19T04:35:33+5:30

सिरोंचा : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज ...

Increased encroachment on forest land | वन जमिनीवर अतिक्रमण वाढले

वन जमिनीवर अतिक्रमण वाढले

Next

सिरोंचा : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठमोठी झाडे तोडून अतिक्रमण केले जात आहे.

खासगी वाहनांकडून नियमांचे उल्लंघन

कुरखेडा : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवाशी भरण्यास बंदी असली तरी कुरखेडा येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अतिक्रमणामुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.

टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव

धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.

कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविना

कोरची : शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांनी वर्गणी गोळा करून वीज जोडणी घेतली. मात्र वीज बिल न भरल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. या शाळासुद्धा विजेविनाच आहेत.

कुरखेडातील नळ जोडणी तपासणी करा

कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा

चामोर्शी : तालुक्यातील भीवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गोगाव बसथांब्यावर गतिरोधक उभारा

गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.

कला दालनातील दुकान गाळे रिकामेच

गडचिरोली : जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांच्या कार्यकाळात पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनाच्या परिसरात व्यवसायासाठी दुकान गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र तीन दुकान गाळे वगळता इतर सात ते आठ दुकान गाळे चढत्या दरामुळे रिकामे आहेत. प्रशासनाने भाडेतत्त्वावरील दर कमी करून ते द्यावेत, अशी मागणी आहे.

आरमाेरी येथे पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव

आरमाेरी: शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे. नगर परिषदेने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे.

प्रसाधनगृह निर्माण करण्याकडे दुर्लक्ष

गडचिरोली : जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. गडचिरोली शहरात व कॉम्प्लेक्स परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. मात्र बसथांबा असलेल्या चामोर्शी, धानोरा, चंद्रपूर, आरमोरी मार्गावर पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह नाही. त्यामुळे महिला व पुरूषांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पालिका प्रशासनाने या ठिकाणी प्रसाधनगृह उभारावे, अशी मागणी होत आहे.

अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा

आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.

व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.

कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा

गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला आहे. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविण्याची मागणी आहे.

औद्योगिक वसाहती स्थापन करा

गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सूट देत वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्या अशी मागणी आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा

गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे खड्डे खोदले आहेत.

शाळेच्या आवारातील विद्युत तारा हटवा

अहेरी: तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीवरून गेलेल्या विद्युत तारांमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. या विद्युत तारा काढण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये याकरिता तारा हटवाव्या, अशी मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्यावेळी मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या

काेरची: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.

कृषी पंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत

वैरागड : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही. ग्रामीण भागातील शेतकरी कार्यालयाच्या येरझारा मारत आहेत.

Web Title: Increased encroachment on forest land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.