वन विभागावर वाढला रिक्त पदांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:39 AM2021-08-19T04:39:47+5:302021-08-19T04:39:47+5:30
गडचिराेली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारपेक्षा अधिक वन ...
गडचिराेली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारपेक्षा अधिक वन कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून, लाकूडतस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.
डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. मोकळी जागाही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी, डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा धुमाकूळ प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्यावतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंड बस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकरांच्या धुमाकूळाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
शाळा आवारात जनावरांचा वावर
आलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन धुमाकूळ घालीत आहेत.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी हाेत आहे.
हेमाडपंथी शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. ते मंदिर हेमाडपंथी आहे. या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे, तसेच मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. ते मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते, असे सांगितले जाते. या मंदिरातून भुयार जात असून, ते भुयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, अशी आख्यायिका आहे.
झुडपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा
गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडुपी जंगल आहे. ते जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत.
प्रसाधनगृहाअभावी महिलांची कुचंबणा
चामाेर्शी : ग्रामीण भागातील काही प्रवासी निवाऱ्यांजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित गावातील ग्रामपंचायतींनी याकडे लक्ष देऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा केली जात आहे.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.