धानाचे वाढीव नियोजन

By admin | Published: May 7, 2017 01:28 AM2017-05-07T01:28:05+5:302017-05-07T01:28:05+5:30

२०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Incremental planning | धानाचे वाढीव नियोजन

धानाचे वाढीव नियोजन

Next

कृषी विभागाचे नियोजन : दोन लाख हेक्टरवर यावर्षी लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१७-१८ च्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ५३ हजार हेक्टर आहे. मागील वर्षी १ लाख ८४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. धान पिकासोबतच इतर पिकांच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
धान हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. एकूण लागवड क्षेत्राच्या सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. विशेष करून गडचिरोली जिल्ह्यात खरीपामध्ये धान पिकाची लागवड करण्याचा ओढा असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन धान पिकासाठी पोषक आहे. धान पिकाच्या दृष्टीने प्रत्येक गावात मामा तलाव, बोड्यांची बांधणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५३ हजार हेक्टर आहे. असे असतानाही दरवर्षी धान पिकाच्या लागवडीमध्ये वाढ होत आहे. २०१६-१७ मध्ये १ लाख ८४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड झाली होती. सर्वसाधारण क्षेत्राच्या हे प्रमाण १२१ टक्के आहे. २०१७ च्या खरीप हंगामात दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. धान पिकाच्या लागवडीसाठी आवश्यक असलेली खते, बि-बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार साहित्याचा जिल्ह्यात पुरवठा केला जाणार आहे.

श्री पद्धतीच्या विस्तारासाठी प्रयत्न
श्री पध्दतीने धानाची लागवड केल्यास बियानांचा खर्च कमी होतो. त्याचबरोबर उत्पादनामध्येही वाढ होत असल्याचे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याच पध्दतीने धान पिकाची लागवड करावी, यासाठी कृषी विभाग विशेष प्रचार मोहीम हाती घेणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात अजुनही शेतकरी पारंपरिक पध्दतीनेच धान पिकाची लागवड करते. शेतकऱ्यांमध्ये श्री पध्दतीबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतले आहे.
२०१६-१७ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात पिकासाठी प्रकल्प आधारित कार्यक्रम राबविण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रात्यक्षिके, सधन भात पिक प्रात्यक्षिके एक हजार हेक्टरवर घेतली जाणार आहे. संकरीत भाताचे प्रात्यक्षिक २०० हेक्टरवर, पीक पध्दतीवर आधारित पीक प्रात्यक्षिके ५०० हेक्टरवर, गादी वाफ्यावर टोकन पध्दतीने लागवडीचे प्रात्यक्षिक १०० हेक्टरवर घेतले जाणार आहे. ३०० हेक्टरवर यांत्रिकी पध्दतीने भाताची लागवड केली जाणार आहे.

सोयाबिनकडे शेतकऱ्यांची पाठ
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, अहेरी व सिरोंचा तालुक्यात सोयाबिन पिकाचे उत्पादन घेतले जाते. या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ हजार ६४६ हेक्टर आहे. २०१६-१७ या वर्षात केवळ १ हजार ६४९ हेक्टरवर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत २९ टक्के हेक्टरवर सोयाबिन पिकाची लागवड झाली. २०१७-१८ मध्ये सोयाबिन पिकाच्या ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. सुरूवातीला शेतकऱ्यांनी सोयाबिन पिकाच्या लागवडीला पसंती दर्शविली होती. मात्र दरवर्षी सोयाबिनच्या उत्पादनात कमालीची घट होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सोयाबिनच्या ऐवजी तूर व इतर पिकांची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Incremental planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.