आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र रूग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:05 AM2018-12-01T01:05:12+5:302018-12-01T01:05:49+5:30
आश्रमशाळेतील एखाद्या विद्यार्थ्याची अचानक प्रकृती बिघडल्यास त्याला रूग्णालयात तत्काळ दाखल करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : आश्रमशाळेतील एखाद्या विद्यार्थ्याची अचानक प्रकृती बिघडल्यास त्याला रूग्णालयात तत्काळ दाखल करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण शुक्रवारी (दि.३०) विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, उपवनसंरक्षक सिध्देश सावर्डेकर, भामरागडच्या नगराध्यक्ष संगीता गाडगे, प्रकल्प अधिकारी निरज मोरे, तहसीलदार कैलास अंडील, संवर्ग विकास अधिकारी चन्नावार, नायब तहसीलदार सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे आदी उपस्थित होते.
राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ३०१ शासकीय आश्रमशाळा व ८ एकलव्य आदर्श निवासी शाळा आहेत. या शाळांमध्ये १ लाख ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अटल आरोग्य वाहिणी ही योजना सुरू केली आहे. प्रत्येकी चार ते सहा आश्रमशाळा एकलव्य निवासी शाळांचा एक समुह तयार केला आहे. प्रत्येक समुहाला एक रूग्णवाहिका देण्यात आली आहे.
या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्र्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. परंतू ते शुक्रवारी येऊ शकत नसल्यामुळे आयुक्तांच्या हस्तेच लोकार्पण उरकण्यात आले. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला होता.
विभागीय आयुक्तांनी भाषणादरम्यान आदिवासी विकास विभागाच्या कार्याचे कौतुक केले. रूग्णवाहिकांमुळे विद्यार्थ्यांना वेळेवर आरोग्यसेवा मिळण्यास मदत होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहिल, असे मार्गदर्शन केले.
रुग्णवाहिकेतून अशी मिळणार सेवा
बेसीक लाईफ सपोर्टसह सज्ज असणाऱ्या या रूग्णवाहिकेत दोन डॉक्टर्स व एक आरोग्य सहायक उपलब्ध राहतील. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे, साथीच्या रोगाचे लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक औषधे व इंजेक्शन यांचा साठा उपलब्ध राहणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल हेल्थ कार्ड तयार केले जाणार आहे. त्यावर त्या विद्यार्थ्याच्या आरोग्याची पूर्ण माहिती राहिल. नियमित डॉक्टरांबरोबरच डोळे, त्वचा, कान, नाक, घसा या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा सुध्दा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रूग्णवाहिकेत ईसीजी मशीन, आॅक्सिजन सिलिंडर व अत्याधुनिक उपकरणे राहतील. सर्प किंवा विंचू दंश यावरील इंजेक्शन सुध्दा राहणार आहे.