विदर्भवादी पुन्हा पेटविणार स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:13 AM2017-07-20T02:13:34+5:302017-07-20T02:13:34+5:30

भाजप पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसह शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यात येईल,

Independent Vidarbha State's agitation agitated again Vidarbha | विदर्भवादी पुन्हा पेटविणार स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन

विदर्भवादी पुन्हा पेटविणार स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन

Next

राम नेवले यांची माहिती : नितीन गडकरींसह सर्व खासदारांचे राजीनामे मागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भाजप पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसह शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता भाजपचे सत्ताधारी नेते स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत एक शब्दही बोलायला तयार नाही. कर्जमुक्तीचा निर्णय घेतला असला तरी यात जाचक अटी टाकल्यामुळे २५ टक्के शेतकऱ्यांनाही या कर्जमुक्तीचा फायदा होणार नाही. त्यामुळे भाजप सरकारने सर्व जनतेची फसवणूक केली आहे. यावर वैदर्भीय जनता प्रचंड आक्रमक झाली असून आता स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन आॅगस्टपासून पुन्हा पेटणार आहे. दरम्यान ९ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील सर्व दहा खासदारांचे राजीनामे मागण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी दिली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हास्तरीय बैठक गडचिरोली येथे बुधवारी पार पडली. त्यानंतर स्थानिक प्रेस क्लब भवनात आयोजित पत्रकार परिषदेत नेवले बोलत होते. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विष्णू आष्टीकर, अरूण मुनघाटे, रमेश भुरसे, अमिता मडावी, विवेक चटगुलवार, विकेश भुरसे, गोवर्धन चव्हाण, एजाज शेख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना राम नेवले यांनी सांगितले की, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची बैठक २४ जून रोजी पार पडली. या बैठकीत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर २४ डिसेंबर २०१७ पर्यंत होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विदर्भ राज्य मागणीचा लढा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. ३० जून २०१७ पर्यंत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सरकारने द्यावी, ही आमच्या समितीची मागणी आहे. मात्र भाजप सरकारने शेतकरी व वैदर्भीय जनतेला सातत्याने फसविले आहे, असे ते म्हणाले. ९ आॅगस्टला केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा राजीनामा मागून ‘भाजपा सरकार चले जाव’ या घोषणेनी आंदोलनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर टप्प्या टप्प्याने प्रत्येक दहा दिवसांनी विदर्भातील सर्व खासदारांचे राजीनामा मागण्याचे आंदोलन होईल. विदर्भासाठी स्थापन केलेल्या नागपूर येथील शहीद चौकातील विदर्भ चंडिकेची ९ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता महापूजा होईल. त्यानंतर विदर्भातून आलेले हजारो विदर्भवादी कार्यकर्ते गडकरी वाड्यावर मोर्चा नेणार आहे. येथे निदर्शने करून तसेच ढोल, ताशे वाजवून ना. गडकरी यांचा राजीनामा मागण्यात येणार आहे, असे नेवले यांनी सांगितले.

टप्प्या-टप्प्याने होणार आंदोलन
विद्यमान सरकारला जागे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २ आॅक्टोबरला यवतमाळ येथे तर ८ आॅक्टोबरला अकोला येथे विदर्भ राज्य परिषद होणार आहे. वैदर्भीय जनतेला निम्मे दराने वीज मिळावी तसेच प्रदूषण करणारे कोळश्यावर आधारीत नव्याने होत असलेले १३२ वीज प्रकल्प त्वरित रद्द करावे, या मागणीसाठी २५ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर येथील वीज निर्मिती प्रकल्पासमोर तर ३१ आॅक्टोबर अमरावती येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. महिलांचे प्रश्न व महिला बचत गटावरील मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करण्यासाठी १२ नोव्हेंबरला गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी येथे तर २४ नोव्हेंबरला बुलढाणा येथे महिला मेळावा होणार आहे. युवा बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, यासाठी ५ नोव्हेंबरला नागपूर येथे, २६ नोव्हेंबरला भंडारा येथे तर ३० नोव्हेंबरला गडचिरोलीत बेरोजगारांचा मेळावा होणार आहे, अशी माहिती राम नेवले यांनी दिली.

 

Web Title: Independent Vidarbha State's agitation agitated again Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.