एमआयडीसीअभावी रखडला देसाईगंजचा औद्योगिक विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 09:56 PM2017-09-02T21:56:30+5:302017-09-02T21:56:47+5:30

औद्योगिक विकासासाठी आवश्यक दळणवळण सुविधांपैकी एक असलेल्या रेल्वे मार्गावर जिल्ह्यातील एकमेव देसाईगंज शहर आहे.

Industrial development of Deshiganj Rudalda due to MIDC | एमआयडीसीअभावी रखडला देसाईगंजचा औद्योगिक विकास

एमआयडीसीअभावी रखडला देसाईगंजचा औद्योगिक विकास

Next
ठळक मुद्देउद्योजकांची निराशा : रेल्वेमार्ग, पोषक वातावरण असूनही सरकारचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : औद्योगिक विकासासाठी आवश्यक दळणवळण सुविधांपैकी एक असलेल्या रेल्वे मार्गावर जिल्ह्यातील एकमेव देसाईगंज शहर आहे. तरीही या शहरात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी अद्याप औद्योगिक विकास महामंडळाने कोणतेही पाऊल उचललेले नाही. त्यामुळे सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेला देसाईगंज तालुक्यात खिळ बसत आहे.
देसाईगंज (वडसा) हे गडचिरोली जिल्ह्यातील दुसºया क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. व्यापारी आणि संपन्न शहर असणाºया देसाईगंजमधील अनेक छोटे-मोठे उद्योजक आपले उद्योग उभारण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. परंतू एमआयडीसी क्षेत्र नसल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळत नाही. सवलतीच्या दरात जागाही मिळत नाही. परिणामी त्यांना आपल्या संकल्पांवर पाणी सोडावे लागत आहे. यातून बेरोजगारीही वाढत आहे.
वास्तविक औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये उद्योगासाठी पोषक वातावरण, सुविधा नसतानाही एमआयडीसी उभारण्यात आली आहे. परंतू देसाईगंजमध्ये दळणवळणाच्या सुविधा आहेत. रेल्वेमार्गावर असलेले हे जिल्ह्यातील एकमेव शहर आहे. लवकरच हे शहर राष्टÑीय महामार्गाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी औद्योगिक विकास झपाट्याने होऊ शकतो. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने या ठिकाणी एमआयडीसी मंजूर होऊ शकली नाही. जिल्ह्यात सध्या गडचिरोली आणि कुरखेडा तालुक्यात चिखली येथे एमआयडीसी क्षेत्र आहे. पण आवश्यक सुविधा आणि पोषक वातावरणाअभावी त्या ठिकाणी मोठे ठिकाणी उद्योग लागू शकले नाही. देसाईगंजमध्ये मात्र सर्व गोष्टी पोषक असताना आतापर्यंत एमआयडीसीच्या मंजुरीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार का घेतला नाही? असा प्रश्न नागरिकांना आणि उद्योगासाठी इच्छुक लोकांना पडला आहे.
८५० एकर जागा रिकामी पडून
देसाईगंजमध्ये पशुसंवर्धन विभागाची ८५० एकर जागा रिकामी पडून आहे. त्या ठिकाणी ५०० एकर जागेवर एमआयडीसी होणार असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधीकडून अनेकदा सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. स्थानिक पातळीपासून राज्य आणि केंद्रात भाजपची एकतर्फी सत्ता असताना एमआयडीसीची मंजुरीच काय, उद्योग येण्यासाठीही पोषक वातावरण आहे. राजकीय मंडळींनी इच्छाशक्ती दाखविल्यास हे काम सहज मार्गी लागेल, अशी अशा नागरिकांना आहे.
नगर परिषदेचा ठराव अन् पाठपुरावा
देसाईगंजमध्ये एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष देसा मोटवानी यांनी नगर परिषदेत ठराव मंजूर करून सरकारकडे पाठविला. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. उद्योग सचिवांची भेट घेऊन त्यांनाही या ठिकाणी एमआयडीसीकरिता उपलब्ध सुविधा आणि पोषक वातावरणाची जाणीव करून दिली. मात्र नंतरच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले, असे मोटवानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या सरकारने केवळ घोषणा न करता त्यांची अंमलबजावणीही करावी, असा टोला त्यांनी लावला.

Web Title: Industrial development of Deshiganj Rudalda due to MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.