२४ घरकुलांना ऐनवेळी ठरविले अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 01:27 AM2016-05-13T01:27:13+5:302016-05-13T01:27:13+5:30
अहेरी पंचायत समिती अंतर्गत आलापल्ली ग्रामपंचायतीमध्ये इंदिरा आवास घरकूल योजनेंतर्गत २४ एप्रिल २०१५ रोजी घरकूल लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली.
आलापल्लीतील प्रकार : लाभार्थ्यांचे संसार सुरू आहे उघड्यावर
आलापल्ली : अहेरी पंचायत समिती अंतर्गत आलापल्ली ग्रामपंचायतीमध्ये इंदिरा आवास घरकूल योजनेंतर्गत २४ एप्रिल २०१५ रोजी घरकूल लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली. मात्र या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या २४ घरकुलांना ऐनवेळी अपात्र ठरविण्यात आले. घरकूल मंजूर झाले म्हणून अनेक लाभार्थ्यांनी घर बांधकाम करण्यासाठी जुने घर जमीनदोस्त केले. मात्र आलापल्ली ग्रामपंचायतीच्या या कारभारामुळे आता अनेक घरकूल लाभार्थ्यांचे संसार उघड्यावर सुरू असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे.
अहेरी पंचायत समितीअंतर्गत आलापल्ली, ग्रामपंचायतीमध्ये इंदिरा आवास घरकूल योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात एकूण १२६ घरकुलांना पात्र ठरवून त्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ७७, अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी ३५ व अल्पसंख्यांकासाठी १४ घरकुलांचा समावेश होता. या १२६ प्रस्तावित पात्र घरकुलांची यादी आलापल्ली ग्रामपंचायतीने अहेरी पंचायत समितीला सादर केली. यापूर्वीच जिल्हा परिषदेमार्फत घरकूल मंजूर असतानाही आता २४ घरकूल ऐनवेळी अहेरी पंचायत समिती व जिल्हा परिषद गडचिरोली यांनी अपात्र दाखविले आहे.
यापूर्वी मंजूर घरकूल लाभार्थ्यांच्या यादीमध्ये सदर २४ लाभार्थ्यांचे नावे समाविष्ट होती. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी नवीन घरकूल बांधकाम करण्यासाठी सुरुवात केली आहे. तर काही लाभार्थ्यांनी जुने झोपडीवजा घर जमीनदोस्त केले आहे. मात्र आता ऐनवेळी या २४ घरकूल लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आल्याने अनेक लाभार्थ्यांचा संसार उघड्यावर सुरू झाला आहे. (वार्ताहर)