बंधाऱ्यांचे निकृष्ट बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:01:00+5:30
सळाखींचा योग्य प्रकारे पिंजरा न बनविता काँक्रिट टाकले जात आहे. याशिवाय वायब्रेट मशीनचाही वापर केला जात नाही. कामावर शासकीय अधिकारी देखरेख ठेवत नसल्याने कंपनीचे कामगार स्वमर्जीने बंधाऱ्याचे बांधकाम करीत आहेत. येथे अनुभवी गवंडीसुद्धा दिसून येत नाही. बहुतांश ठिकाणी नाल्यामधील रेतीचा वापर बांधकामासाठी केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : अहेरी जलसंधारण उपविभागांतर्गत हैैद्राबाद येथील खासगी कंपनीच्या वतीने घोट परिसरात सात बंधारे मंजूर आहेत. यापैैकी पाच बंधाऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु बंधारा बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याने सदर बंधारे किती वर्ष टिकणार याबाबत नागरिकांमध्ये साशंक भावना आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बांधकामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
घोट परिसरात मार्च २०२० पासून मच्छली, चापलवाडासह परिसरात जवळपास सात बंधारे मंजूर करून बांधकामही सुरू झाले. त्यापैैकी पाच बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. विशेष म्हणजे चामोर्शी तालुक्यात १२ ते १३ बंधाऱ्याचे काम जलसंधारण विभागाकडून हैैद्राबाद येथील कोरेड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीला देण्यात आली. परंतु या कामांवर जलसंधारण विभागाच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष दिसून येते. याचा फायदा घेत कंपनीकडून बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम केले जात आहे. माती व गाळ मिश्रीत रेतीचा वापर करून सिमेंट काँक्रिट केले जात आहे. तसेच सळाखींचा योग्य प्रकारे पिंजरा न बनविता काँक्रिट टाकले जात आहे. याशिवाय वायब्रेट मशीनचाही वापर केला जात नाही. कामावर शासकीय अधिकारी देखरेख ठेवत नसल्याने कंपनीचे कामगार स्वमर्जीने बंधाऱ्याचे बांधकाम करीत आहेत. येथे अनुभवी गवंडीसुद्धा दिसून येत नाही. बहुतांश ठिकाणी नाल्यामधील रेतीचा वापर बांधकामासाठी केला जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिसून येत असल्याने जोरदार पाऊस येऊन पूर आल्यास बांधकाम ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्च महिन्यात सुरू केलेले काम लवकर करणे आवश्यक होते. अथवा वर्षाच्या सुरूवातीलाच सदर काम हाती घेणे गरजेचे होते. परंतु या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, लॉकडाऊनच्या काळात सदर काम रखडल्याने आगामी काळात किती दिवसात काम पूर्ण होईल, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मच्छली-चापलवाडा नाल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती रिजेक्ट करण्यात आली आहे. बंधारा बांधकामासाठी उत्कृष्ट रेती व साहित्याचा वापर करण्यात येईल. बंधारे बांधकामस्थळी आपण नेहमीच येत असतो. आपल्या देखरेखी खाली बांधकाम सुरू आहे. या बंधारा बांधकामासंदर्भात नागरिकांच्या काही शंका असल्यास त्यांचे समाधान केले जाईल. बंधारा बांधकामस्थळी कनिष्ठ अभियंत्यांना याकरिता पाठविले जाईल.
- श्रावण शेंडे, उपअभियंता, जलसंधार उपविभाग, अहेरी