धान पिकावर गादमाशी व खोडकिडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:40 AM2021-08-28T04:40:29+5:302021-08-28T04:40:29+5:30
खोडकिडा ही कीड धान पिकाच्या सर्व अवस्थेत येणारी असून, हिची मादी पतंग धान पिकाच्या कोवळ्या पानांवर १५० ते २०० ...
खोडकिडा ही कीड धान पिकाच्या सर्व अवस्थेत येणारी असून, हिची मादी पतंग धान पिकाच्या कोवळ्या पानांवर १५० ते २०० अंडी पुंजक्याने घालून नारंगी रंगाच्या धाग्याने झाकून देते. या अंड्यामधून ५ ते ८ दिवसांनंतर खोडकिडीच्या अळ्या बाहेर येऊन पिकाच्या खोडामध्ये आत आपली उपजीविका करतात. त्यामुळे धानाचा येणारा नवीन गाभा सुकल्यासारखा दिसतो. त्यालाच गाभेमर किंवा डेडहर्ट असे म्हणतात. असेच नुकसान खोडकिडीने धान गर्भावस्थेत असताना केल्यास धानाची वाळलेली लोंबी बाहेर पडते, तिला पळींज किंवा गाभेमर असे म्हणतात. खोडकिडीची अळी धानाच्या पोंग्यामध्येच कोषावस्थेत जाऊन, त्यामधून पुन्हा ७ ते ८ दिवसांनी आणखी तिचे पंतग बाहेर पडतात. अशा प्रकारे खोडकिडा आपली एक पिढी ४० ते ४५ दिवसांत पूर्ण करते. खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यसवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, यासाठी उन्हाळ्यात जमिनीची उभी-आडवी खोल नांगरटी करावी. धानाची कापणी जमिनीलगत करावी, जेणेकरून भाताच्या शेजामध्ये असलेले खोडकिडीचे कोष नष्ट होतील. शेताचे बांध नेहमीच स्वच्छ ठेवावे, फेरोमन ट्रॅप (लैंगिक सापळे)चा वापर हेक्टरी २० ते २५ इतका करावा. एकात्मिक व्यवस्थापनातून गादमाशी व खाेडकिडीचा बंदाेबस्त शेतकऱ्यांनी करावा, असा सल्ला उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे यांनी दिला आहे.
बाॅक्स
राेवणीनंतर करावी फवारणी
रोवणीनंतर १५ दिवसांनी ट्रायकोग्रामा जापोनिकम या मित्रकिडीची अंडी हेक्टरी ५० हजार इतकी ३ ते ४ वेळा १० दिवसांच्या अंतराने शेतात सोडावी. निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काची फवारणी करावी, बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाची १ किलो प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. खोडकिडीमुळे झालेली हानी नुकसान पातळीच्या वर गेल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. यात क्लोरोपायरीफॉस २० ई.सी. ४०० मि.ली. किंवा क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही ६०० मि.ली. किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड ५० टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी ३०० ग्रॅम किंवा क्लोॲन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एसपी ६० मिली यापैकी एका कीटकनाशकाची २०० लीटर पाण्यात मिसळवून प्रती एकर सकाळी किंवा सायंकाळी हवा शांत असताना फवारणी करावी.
बाॅक्स
असे आहे गादमाशीचे स्वरूप
गादमाशी प्रौढ डासांसारखी दिसत असून, रंग तांबडा व पाय लांब असतात. गादमाशीची मादी १५० ते २०० अंडी एक-एक प्रमाणे धानाच्या पानाच्या खालच्या भागात देत असून, अंडी ही लांबोळकी व कुंकवाच्या रंगासारखी दिसतात. अळीचा रंग हा पिवळसर पांढरा असतो आणि त्या वाढत्या अंकुरावर १५ ते २० दिवसांपर्यंत खात असतात, त्यामुळे मुख्य खोडाची वाढ न होता नळी किंवा चंदेरी पोंगा तयार होतो. अशा पोंग्यांना लोंबी धरत नाही, तसेच बुंध्याच्या बाजूला अनेक फुटवे फुटलेले दिसतात. अळी खोडामध्येच कोषावस्थेत जाते. पुन्हा कोषामधून प्रौढ माशी ५ ते ७ दिवसांत बाहेर येते. गादमाशीची एक पिढी पूर्ण करण्यास गादमाशीला ३ आठवडे लागतात, यासाठी एकिकृत व्यवस्थापन करावे.
बाॅक्स
गादमाशीचा असा करा नायनाट
शेतातून धानाव्यतिरिक्त इतर पूरक खाद्य वनस्पती (देवधान) नष्ट करावे, कापणीनंतर शेतात नांगरणी करून धसकटे नष्ट करावीत, रोवणी करताना गादमुक्त रोपांची लावणी करावी, रोवणीनंतर या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच किंवा आवश्यकतेनुसार रोवणीनंतर १० दिवसांनी क्विनालफॉस ५ टक्के दाणेदार ६ किलो किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल ०.४ जी. ४ किलो प्रती एकर या प्रमाणात बांधीमध्ये ७ ते १० सेमी पाणी असताना वापरावे. बांधीतील पाणी ३४ दिवस बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
270821\img-20210826-wa0038.jpg~270821\img-20210826-wa0037.jpg
गादमाशी व खोडकिडीचे वेळीच व्यवस्थापण करा : उपविभागीय कृषि अधिकारी यांचा शेतकऱ्यांना आवाहन!~गादमाशी व खोडकिडीचे वेळीच व्यवस्थापण करा : उपविभागीय कृषि अधिकारी यांचा शेतकऱ्यांना आवाहन!