धानावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:02 AM2018-09-23T01:02:10+5:302018-09-23T01:02:40+5:30

दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Inflammation on the chest | धानावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव

धानावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव

googlenewsNext
ठळक मुद्देवैरागड परिसरात उद्रेक : शेतकऱ्यांकडून कीटकनाशकांची फवारणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सुरुवातीला अगदी वेळेवर पाऊस झाल्याने धानाची सर्वच कामे वेळेवर पूर्ण झाली. त्यामुळे धानपिकाची स्थिती चांगली होती. मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धानावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हलके धानपीक निसवले आहे. मात्र पीक हातात येण्यासाठी पुन्हा एका पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या शेतकºयांकडे तलाव, बोडी आहेत, असे शेतकरी धानपिकाला पाणी देत आहेत.
मागील वर्षी धान निसवण्याच्या मार्गावर असताना मावा, तुडतुडा रोगाचा प्रकोप झाला होता. निसवलेले धान करपताना शेतकºयांना बघावे लागत होते. परिणामी उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे यावर्षी शेतकरी धास्तावला आहे. रोग आटोक्यात यावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके फवारली जात आहेत.

जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
कुरखेडा : मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले होते. दरम्यान मोटार पंप, डिझेल इंजिनच्या माध्यमातून पाणी देऊन धान वाचविण्याचा प्रयत्न शेतकºयांकडून केला सुरू होता. याच कालावधीत गुरूवारी व शुक्रवारी अशा दोन्ही दिवशी पावसाच्या दमदार सरी बरसल्या. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी अगदी वेळेवर पाऊस पडला. त्यामुळे रोवणीची कामे वेळेवर होऊन धानपीक डोलत होते. मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक धोक्यात आले होते. हलके पीक निसवण्याच्या मार्गावर आहे. याही पिकाला पाण्याची आवश्यकता होती. नेमक्या याच वेळी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

पिकांच्या संरक्षणासाठी साडीचे कुंपण
खरीप हंगामातील अल्पमुदतीचे धानपीक आता शेवटच्या टप्प्यात आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने भरघोष उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी बाळगली आहे. मात्र धानपीक लोंबावर असताना रानडुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी जुन्या साड्यांचा वापर करून कुंपण तयार केला आहे.
कधी नव्हे एवढा रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. रोवणी झाल्यानंतर धानपीक पालवीला आल्यापासूनच रानडुकरांकडून धानपिकाची नासाडी सुरू आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, करपडा, कोजबी, गणेशपूर, सिर्सी आदी गावातील शेतकऱ्यांची रानडुकर हैदोसाबाबत ओरड सुरू आहे. वन्यजिवांकडून होणाºया नुकसानीबद्दल शेतकºयांनी वैरागडचे क्षेत्रसहायक, वनरक्षक यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार केली. मात्र रानडुकर बंदोबस्ताची वन विभागाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही. अशा स्थितीत साड्यांपासून कुंपण बनवून अनेक शेतकरी आपल्या धानपिकाचे संरक्षण करीत आहेत.

Web Title: Inflammation on the chest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.