पोषण आहाराला महागाईचा फटका, तेलाऐवजी दिली जाते साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:27 AM2021-06-02T04:27:37+5:302021-06-02T04:27:37+5:30
गावोगावच्या अंगणवाड्यांमधून बालकांना ताजा व गरम पोषण आहार दिला जात होता; पण कोरोना काळामुळे आता अंगणवाड्यांमध्ये शिजविलेले अन्न देण्याऐवजी ...
गावोगावच्या अंगणवाड्यांमधून बालकांना ताजा व गरम पोषण आहार दिला जात होता; पण कोरोना काळामुळे आता अंगणवाड्यांमध्ये शिजविलेले अन्न देण्याऐवजी त्या बालकांना दोन महिन्यांच्या आहाराचे पॅकेट्स वाटप केले जात आहे. याशिवाय गरोदर महिला, स्तनदा माता यांनाही पोषण आहारासाठी रोजच्या आहाराच्या परिमाणानुसार गहू, तांदूळ, मूग, मसूरडाळ, चणे, मीठ, हळद, तिखट आणि फोडणीसाठी तेलही दिले जात होते. मात्र गेल्या काही महिन्यांत तेलाचे दर खूपच वाढल्यामुळे या पोषण आहारातून तेल गायब करून त्याऐवजी साखर दिली जात आहे.
आधीच कोरोनाच्या संकटामुळे कामधंदे नाहीत; त्यात आता फोडणीसाठी महागाचे तेल कसे आणायचे? असा प्रश्न अनेक लाभार्थी कुटुंबीयांना पडला आहे.
(बॉक्स)
काय-काय मिळते?
- सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना रोजच्या आहारासाठी चवळी किंवा चणे (३० ग्रॅम), मूग किंवा मसूरडाळ (२० ग्रॅम), तिखट ४ ग्रॅम, हळद ४ ग्रॅम, मीठ ८ ग्रॅम आणि साखर २० ग्रॅम.
- ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी चवळी किंवा चणे (३० ग्रॅम), मूगदाळ (२० ग्रॅम), गहू (३८ ग्रॅम), तांदूळ (३८ ग्रॅम), मिरची (४ ग्रॅम), हळद (४ ग्रॅम), मीठ (८ ग्रॅम) आणि साखर २० ग्रॅम.
- गरोदर आणि स्तनदा मातांसाठी चणे (४० ग्रॅम), मूगडाळ (३१.५ ग्रॅम), गहू (८१ ग्रॅम), मिरची (४ ग्रॅम), हळद (४ ग्रॅम), हळद (४ ग्रॅम), मीठ (८ ग्रॅम) आणि साखर (२० ग्रॅम).
शासनाकडून बालक आणि गरोदर महिला किंवा स्तनदा मातांसाठी दिला जाणारा हा पोषण आहार पूरक स्वरूपातील आहे. म्हणजे त्यांनी आपल्या घरातील नियमित आहारही घ्यावा; पण हा पोषण आहार आवर्जून खावा. शारीरिक सुदृढतेसाठी ते गरजेचे आहे. त्यातून तेल वगळले असले तरी लोकांचा घरातील साखरेचा खर्च थोडा का होईना, कमी झाला आहे. त्यातून तेलाची भरपाई करावी.
- सी. डब्ल्यू. लामतुरे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास)
(कोट)
आहाराची पॅकेट दोन महिन्यांतून एकदा मिळतात. आता तेल मिळत नसल्यामुळे थोडी अडचण निर्माण झाली आहे. महाग तेल विकत घेणे सरकारलाच परवडत नाही, तर आम्हांला कसे परवडणार?
- गायत्री भोयर, लाभार्थी महिला
तेल मिळत नसल्यामुळे अडचण तर आहे; पण त्याऐवजी साखर मिळत असल्यामुळे काही तक्रार नाही. जे मिळते ते घेणारच, बाकी घरातील आहार तर घेतोच आहे.
- सुलभा बोभाटे, लाभार्थी महिला
मुलांसाठी मिळणाऱ्या साहित्यात तेल तर गायब झालेच; पण यावेळी मीठही मिळाले नाही. मिठाची कंपनी बंद असल्यामुळे पुरवठा झाला नसल्याचे सांगण्यात आले. बाकी पोषण आहाराचे साहित्य चांगले आहे.
- निखिल जरूरकर, पालक
-----
सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थी- ३८,६३३
३ ते ६ वर्षे गटातील लाभार्थी - ४६,७४६
गरोदर महिला लाभार्थी- ९२०८
स्तनदा माता लाभार्थी - ८०९६