इंजेवारीत पशुपालकच करतात जनावरांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:39 AM2021-02-09T04:39:20+5:302021-02-09T04:39:20+5:30
आरमोरी : तालुक्याच्या इंजेवारी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आजारी पशुधनावर वेळीच व याेग्य प्रकारे उपचार हाेत नाहीत. अधिकारी व कर्मचारी ...
आरमोरी : तालुक्याच्या इंजेवारी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आजारी पशुधनावर वेळीच व याेग्य प्रकारे उपचार हाेत नाहीत. अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतानाही पशुपालकांनाच अनेकदा जनावरांची जखम धुणे व औषध लावणे आदी कामे करावी लागतात. परंतु याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे.
शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध याेजना राबवत आहे. यामध्ये शेतीपयाेगी अवजारांचे वाटप व दुधाळ जनावरे वाटप यासह विविध याेजनांचा समावेश आहे. जनावरांचे आराेग्य सुदृढ राहावे व त्यांच्यावर याेग्य उपचार व्हावा, यासाठी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. परंतु दवाखान्यामध्ये याेग्य प्रकारे जनावरांवर उपचार केला जात नाही. हीच स्थिती तालुक्यातील इंजेवारी पशुवैद्यकीय दवाखान्यात आहे. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी मनमानी करीत असल्याने सर्वसामान्य पशुपालकांना त्याचा फटका बसत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात गाय, बैल, शेळी तथा अन्य जनावरांना उपचारासाठी नेले असता तेथील कर्मचारी स्वतः खुर्चीवर बसून पशुपालकांना जनावरांची जखम साफ करायला लावतात. अनेकदा औषध लावण्यासापासूनची कामे पशुपालकच करतात. सरकारने नियुक्त केलेले कर्मचारी आपली जबाबदारी याेग्य प्रकारे का पार पाडत नाहीत, असा सवाल पशुपालक हरिदास मोगरकर यांनी केला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील पशुपालकांनी केली आहे.