मेडिकल प्रवेश प्रक्रियेत ओबीसींवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:33 AM2017-07-22T00:33:35+5:302017-07-22T00:33:35+5:30
राज्यातच नव्हे तर देशात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा ही नीटनुसार सुरू झाली आहे.
६८ जागा : ओबीसी विद्यार्थी संघटनेचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातच नव्हे तर देशात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा ही नीटनुसार सुरू झाली आहे. ओबीसींना राज्याप्रमाणे देशपातळीवर २७ टक्के आरक्षण देणे बंधनकारक आहे. परंतु केंद्रातील १५ टक्के जागांच्या प्रवेश प्रक्रियेत केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने ओबीसींच्या ५७ टक्के आरक्षणाला छेद देत केवळ २ टक्के म्हणजे ६८ जागा दिल्या. ओबीसींच्या हक्काच्या उर्वरित २५ टक्के जागा खुल्या वर्गाकडे वळत्या केल्या. त्यामुळे ओबीसींवर अन्याय झाला, असा आरोप ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे यांनी केला आहे.
यासंदर्भात वांढरे यांनी म्हटले आहे की, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ६६ हजार ८३५ जागा आहेत. राज्यात आरक्षण धोरणानुसार अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी, ओबीसींसाठी जागा निश्चित करण्यात आल्या. याच धर्तीवर देशपातळीवर जागांचे प्रवेश निश्चित करताना एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांना राज्यात आरक्षणाचा निकष लावणे बंधनकार होते. मात्र ओबीसींना आरक्षणानुसार जागा दिल्या नाही. त्यामुळे ओबीसी उमेदवारांवर प्रचंड अन्याय झाला, असे म्हटले आहे.