जामी यांच्या मृत्यूची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 02:18 AM2017-04-19T02:18:42+5:302017-04-19T02:18:42+5:30
इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे २००५ च्या बॅचचे विद्यार्थी असलेले डॉ. आर. एल. जामी यांचा रविवारी धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
विद्यार्थ्यांची मागणी : ‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्यावर संशय
आलापल्ली : इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे २००५ च्या बॅचचे विद्यार्थी असलेले डॉ. आर. एल. जामी यांचा रविवारी धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. एका होतकरू डॉक्टरच्या मृत्यूमुळे नागपूर येथील मेयो रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली. डॉ. जामी यांच्यासोबत पार्टीमध्ये असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या असंवेदनशीलतेमुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मेयोतील विद्यार्थ्यांनी केली आहे.
४४ अंशाच्या वर तापमान असताना भामरागडनजीकच्या बिनागुंडा येथील राजरप्पी धबधब्यावर आंघोळीचा बेत आखण्यात आला. हा बेत एका युवा होतकरू वैद्यकीय अधिकाऱ्याच्या जीवावर बेतला. जामी यांचा आंघोळ करीत असताना बुडून मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. डॉ. जामी हे उत्तम जलतरणपटू होते. तरीसुद्धा त्यांचा बुडून मृत्यू व्हावा, याविषयी संशयाची भावना अनेकांच्या मनात आहे.
या ठिकाणी उपस्थित त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेवरही संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)
मृतदेहासोबत कुणीही नव्हते
सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास डॉ. जामीन यांचा मृतदेह नागपूर येथे आणण्यात आला. जामी यांच्या सोबत पार्टीत सहभागी असलेल्या एकाही अधिकाऱ्याने त्यांच्यासोबत येण्याचे सौजन्य दाखविले नाही. गडचिरोली येथे आरोग्य विभागात दोन अधिकाऱ्याच्या जोडीने यापूर्वीही अशा अनेक पार्ट्या विविध तालुक्यात आयोजित केल्या आहेत. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हा जुना धंदा आहे. यासंदर्भात जामी यांचे मित्र आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार करून असून संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.