पिकांवर किडींचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:26 AM2017-09-08T00:26:21+5:302017-09-08T00:29:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाभरातील ४ हजार ६४० हेक्टर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हजारो रूपयांच्या कीटकनाशकांची फवारणी करूनही किड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी पावसाने सुरूवातीपासूनच हुलकावणी दिली. त्यामुळे धानाची रोवणी उशीरा झाली. अगदी आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत धान रोवणीची कामे सुरू होती. रोवणी उशीरा झाल्याने तसेच वातावरणात दमटपणा असल्याने धान पिकावर कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडे, खोडकिडा, गादमाशी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे दिसून आले आहे.
विशेष करून देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची, अहेरी, एटापल्ली, भामरागड या तालुक्यांमध्ये किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषी केंद्र चालक व कृषी सहायक यांचा सल्ला घेत शेतकरी धान पिकावर विविध प्रकारची कीटकनाशके फवारत आहेत. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. उशीरा रोवणे झाल्याने धानाच्या उत्पादनात घट होणार आहे. ही बाब निश्चित असताना त्यातच आता किडीनेही आक्रमण केले आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
धान पिकावर वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन कृषी विभाग सतर्क झाला असून जिल्हाभरातील कृषी सहायक किडीच्या प्रकारानुसार कोणती कीटकनाशके फवारावी याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.
मागील आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे व दिवसा कडक ऊन पडत असल्याने वातावरणात दमटपणा निर्माण झाला आहे. दमट वातावरणात नवीन किडीची संख्या झपाट्याने वाढते. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका कृषी विभागाच्या अधिकाºयांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला आहे.
२ हजार ८२७ हेक्टरवरील कीड नियंत्रणात
धान, सोयाबिन, तूर आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे लक्षात येताच शेतकºयांनी कृषी सहायकांच्या सल्ल्यानुसार कीटकनाशकांची फवारणी केली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील २ हजार ८२७ हेक्टरवरील किड नियंत्रणात आली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३०२ हेक्टर, धानोरा तालुक्यातील २१९ हेक्टर, मुलचेरा १९१, चामोर्शी तालुक्यातील ४८७, देसाईगंज तालुक्यातील ३१८, आरमोरी ६२७, अहेरी तालुक्यातील ४६०, एटापल्ली १४५, भामरागड तालुक्यातील ३६ हेक्टरवरील रोग नियंत्रणात आले आहे.