स्कूलबसची तपासणी करा अन्यथा होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:31 PM2019-05-27T22:31:12+5:302019-05-27T22:31:32+5:30
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांची शाळा सुरू होण्याच्या पूर्वी फेरतपासणी करणे आवश्यक आहे. अशी तपासणी न करता वाहन तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे आढळल्यास त्या स्कूल बसेसवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांची शाळा सुरू होण्याच्या पूर्वी फेरतपासणी करणे आवश्यक आहे. अशी तपासणी न करता वाहन तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे आढळल्यास त्या स्कूल बसेसवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार उन्हाळी सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकरिता वापरण्यात येणाºया बस, व्हॅनची फेरतपासणी करणे आवश्यक आहे. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य असले तरी अशा वाहनांनी शालेय सत्र सुरू होण्यापूर्वी तपासणी अधिकाºयाकडे वाहन सादर करून वाहन तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची खातरजमा करावी, असे परिवहन विभागाने कळविले आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दैनंदिन कामाचे संगणकीकरण झाले आहे. बहुतांश कामे संगणकीय प्रणालीद्वारे केली जातात. वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भातील कामे परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून करता येतात. अर्जदारांनी स्वत:ची कामे स्वत: करून मध्यस्थांच्या उच्चाटनासाठी कार्यालयाला सहकार्य करावे. संगणकीय प्रणालीत काही अडचण उद्भवल्यास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
वाहन तपासणी मोहीम सुरू
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीविषयी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचे गांभिर्य लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीतर्फे स्कूल बस तपासणी मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक सेवेकरिता वापरण्यात येत असलेल्या वाहनांची सुध्दा तपासणी केली जाणार आहे. त्याकरिता वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे सर्व दस्तावेज विधीग्राह्य असल्याची खात्री करावी. विनायोग्यता प्रमाणपत्र किंवा वाहन विमा नसताना वाहन सार्वजनिक रस्त्यावर वापरताना आढळल्यास अशा वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.