मुरूमगावच्या शिबिरात ७५० रूग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:20 AM2017-11-27T00:20:10+5:302017-11-27T00:20:22+5:30
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर शाखा धानोराच्या वतीने तालुक्यातील मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी आरोग्य व रोगनिदान शिबिर घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर शाखा धानोराच्या वतीने तालुक्यातील मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी आरोग्य व रोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्व प्रकारच्या रोगांचे मिळून एकूण ७५० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी २५ रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साईनाथ साळवे होते. प्रमुख अतिथी म्हणून वसंत थोटे, सुनिल मेहर, विकास वडेट्टीवार, जि.प. सदस्य लता पुंघाटे, पं.स. सभापती अजमन राऊत, ताराबाई कोटगले, विजय कुमरे, श्रावण कावळे आदी उपस्थित होते. तपासणीनंतर रूग्णांना औषधीची मोफत वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, डॉ. गौरशेट्टीवार, डॉ. सुनिल मडावी, डॉ. सीमा मडावी व चमूने केली.
शिबिराला आमदार डॉ. देवराव होळी, शशिकांत साळवे, महादेव गणोरकर, नगरसेविका रेखा हलामी, नगरसेविका गीता वालको आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे, वनमंत्री मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनीही या शिबिरात अनेक रूग्णांची तपासणी केली. मुरूमगाव परिसरातील चार ते पाच गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात मधुमेह, हृदयरोग, सिकलसेल, वात विकार यांच्यासह विविध प्रकारच्या आजार व रोगांच्या रूग्णांची तपासणी करून निदान करण्यात आले.