आरोग्यमित्रांद्वारे तपासणी
By admin | Published: November 20, 2014 10:50 PM2014-11-20T22:50:58+5:302014-11-20T22:50:58+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या रूग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र डॉक्टर नसल्याने आरोग्यमित्रांकडून रूग्णांची तपासणी केली जात आहे.
जिल्हा रूग्णालय : राजीव गांधी जीवनदायी योजना
गडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या रूग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र डॉक्टर नसल्याने आरोग्यमित्रांकडून रूग्णांची तपासणी केली जात आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वतंत्र डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजनेचे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात आरोग्य मित्र नेमण्यात आले आहेत. हे आरोग्य मित्र राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत औषधोपचार करण्यासाठी रूग्णाला गडचिरोली येथे पाठवितात. राजीव गांधी योजनेसोबत जोडल्या गेलेल्या रूग्णालयाने रूग्णांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र डॉक्टरची नियुक्ती करावी, असे बंधन घालण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात मात्र स्वतंत्र डॉक्टर नेमण्यात आले नसून याचा प्रभार दुसऱ्या एका डॉक्टरवर सोपविण्यात आला आहे. सदर डॉक्टर जिल्हा सामान्य रूग्णालयाचे काम सांभाळून राजीव गांधी योजनेच्याही रूग्णांची तपासणी करतात. मात्र सदर डॉक्टर बऱ्याचवेळा उपस्थित राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रूग्णाला ताटकळत बसावे लागते. शेकडो किमी अंतरावरून आलेल्या रूग्णांचा यामुळे भ्रमनिरास होतो.
त्रस्त झालेल्या रूग्णांची केवीलवानी परिस्थिती बघून राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत नेमण्यात आलेले आरोग्य मित्र बऱ्याचवेळा रूग्णांची तपासणी करीत असल्याचे दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे, आरोग्यमित्रांना वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेच ज्ञान नाही. त्यामुळे एखादेवेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वतंत्र डॉक्टर नसल्याने रूग्णांच्या आॅपरेशनची परवानगी मागण्यासही उशीर होत असल्याने राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या रूग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (नगर प्रतिनिधी)