जिल्हाधिकाऱ्यांकडून भाजीपाला व फळबागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:37 AM2021-04-01T04:37:09+5:302021-04-01T04:37:09+5:30
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कासवी येथील पोलीसपाटील बाळकृष्ण सडमाके यांच्या शेतीला भेट देऊन आमराई, फणसाची बाग तसेच भाजीपाला पिकाची पाहणी केली. ...
भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कासवी येथील पोलीसपाटील बाळकृष्ण सडमाके यांच्या शेतीला भेट देऊन आमराई, फणसाची बाग तसेच भाजीपाला पिकाची पाहणी केली. शेतकरी बाळकृष्ण सडमाके यांनी एक हेक्टरमध्ये आंबा आणि फणसाची झाडे लावली आहेत. तसेच माेकळ्या जागेत भुईमूग व भाजीपाल्याची लागवड केली आहे. १९८८-८९ मध्ये कृषी विभागाकडून अनुदान घेऊन ६० आंब्यांची झाडे तसेच फणसाच्या २० झाडांची लागवड केली. त्यानंतर २००५-०६ मध्ये आंब्याची ८० झाडे लावली. तीन वर्षांपर्यंत ७५ टक्के जिवंत झाडे राहिल्यास या योजनेचा लाभ लाभार्थींना मिळतो, अशी माहिती शेतकरी बाळकृष्ण सडमाके यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला व आमदार कृष्णा गजबे यांना दिली. या बागेतून दोन ते अडीच लाख रुपयांचे बऱ्यापैकी उत्पादन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावर्षी कृषी विभागाकडून आणलेले ज्वारीचे बियाणे केवळ २५ टक्केच उगवल्याचे त्यांनी सांगितले. कासवी ते पळसगाव मार्गावर गाढवी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात शालेय विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांना पळसगाव किंवा जोगीसाखरा येथे जाण्यासाठी १५ कि.मी. फेरा मारून जावे लागते. अनेकदा नदी दुथडी भरून वाहत असल्याने हा मार्ग बंद असताे. त्यामुळे कासवी ते पळसगावदरम्यानच्या गाढवी नदीवर उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
याप्रसंगी आ. कृष्णा गजबे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, शेतकरी बाळकृष्ण सडमाके, माजी उपसरपंच प्रवीण राहटे, नंदू नाकतोडे, पी.पी.निंदेकर, तलाठी वासुदेव नागापुरे, ग्रा.पं.सदस्य उदाराम दिघोरे, रोशन भोयर, जितेंद्र ठाकरे, संजय सोनटक्के, अमित राठोड उपस्थित होते.