पालापाचाेळा जाळण्याऐवजी ताे बाजूला जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:33 AM2021-03-07T04:33:16+5:302021-03-07T04:33:16+5:30
जाेगीसाखरा : माेहफुलाच्या झाडाखालचा पालापाचाेळा जाळल्यामुळेच जंगलाला सर्वाधिक आगी लागत असतात. त्यामुळे नागरिकांनी पालापाचाेळा जाळण्याऐवजी ताे बाजूला जमा करून ...
जाेगीसाखरा : माेहफुलाच्या झाडाखालचा पालापाचाेळा जाळल्यामुळेच जंगलाला सर्वाधिक आगी लागत असतात. त्यामुळे नागरिकांनी पालापाचाेळा जाळण्याऐवजी ताे बाजूला जमा करून ठेवावा, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले असून, याबाबत जागृती केली जात आहे.
पळसगाव उपक्षेत्रात घनदाट जंगल असून, वन्य प्राण्यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. उन्हाची तीव्रता बघता जंगलातील सुकलेला पालापाचोळा छोट्याशा ठिणगीनेदेखील पेटून संपूर्ण जंगलाला मोठ्या झपाट्याने आग लागून वन व वन्य प्राण्यांची मोठी हानी होण्याची शक्यता राहते. आगीमुळे कधीही भरून न येणारी हानी होऊ नये म्हणून वन विभागाने जागृती करण्यास सुरुवात केली आहे. मोहफूल झाडाखालील पालापाचोळा व्यवस्थित जमा करून एका बाजूला करावा. पूर्णतः आग विझेपर्यंत थांबण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. जंगल मार्गाने जाताना बिडी, सिगारेट रस्त्याकडेला टाकू नये. तेंदू खूट कटाई करताना जंगलात आग लावू नये, असे आवाहन केले जात आहे.
निसर्गाचे संतुलन राखणारे वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी आणि सूक्ष्म जीवजंतू यांचे अस्तित्व कायम टिकवून ठेवणे, हे माणसाच्या हातात आहे. प्रत्येकाने वन्य प्राण्यांचे महत्त्व लक्षात घेऊन आगीपासून वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याकरिता वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पळसगाव उपक्षेत्राचे वनपाल गाजी शेख, वनरक्षक विजय जनबंधू, दिगंबर गेडाम, सपना वालदे, रूपा सहारे, प्रिया करकाडे यांनी केले आहे. पळसगाव, पाथरगाेटा, जोगीसाखरा, शंकरनगर, सालमारा, कराडी, सावरखेडा येथील लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पत्रके वाटण्यात येत आहेत. तसेच ध्वनिक्षेपकाद्वारेही आवाहन केले जात आहे.