दुर्गम भागात सुविधा देणारी संस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 01:32 AM2017-05-08T01:32:42+5:302017-05-08T01:32:42+5:30
जागतिक स्तरावर आरोग्यविषयक क्षेत्रात काम करणाऱ्या रेडक्रॉस सोसायटीची गडचिरोलीत शाखा स्थापन होऊन १४ वर्ष पूर्ण झाले आहे.
जागतिक रेडक्रॉस दिन : गडचिरोली रेडक्रॉसला १४ वर्ष पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जागतिक स्तरावर आरोग्यविषयक क्षेत्रात काम करणाऱ्या रेडक्रॉस सोसायटीची गडचिरोलीत शाखा स्थापन होऊन १४ वर्ष पूर्ण झाले आहे. या कालखंडात आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त भागात सर्वसामान्य लोकांना आरोग्यविषयक सेवा देण्यासोबतच विविध सामाजिक उपक्रमातही रेडक्रॉस सोसायटीचे काम सुरू आहे.
मार्च २००३ मध्ये गडचिरोलीत रेडक्रॉस सोसायटीच्यामार्फत काम सुरू झाले. जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड तालुक्यातील दुर्गम भागात रेडक्रॉस सोसायटीमार्फत अनेक समाजोपयोगी कार्य केले जात आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत करण्याच्या उद्देशाने रेडक्रॉस सोसायटीची स्थापना करण्यात आली. त्या अनुषंगाने रेडक्रॉस सोसायटीमार्फत कार्य केले जात आहे. अपघात, पूर, गारपीट, वादळ यासह नैसर्गिक आपत्तीच्यावेळी रेडक्रॉस सोसायटीमार्फत मदतीचे कार्य जिल्ह्यात केले जात आहे. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात अधिक राहत असल्याने एटापल्ली तालुक्यात मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे सुधारीत बी, बियाणे व भाजीपाला लागवड करण्यासाठी भाजीपाल्याचे बीज वितरीत करण्यात आले. पाण्याचा सदुपयोग करण्यासाठी घरालगत भाजीपाला लागवड करण्याचा उपक्रमही एटापल्ली तालुक्यात राबविण्यात आला. राजोली, पोटेगाव येथे ढगफुटी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांची वाताहत झाली होती.
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण रेडक्रॉस सोसायटीतर्फे करण्यात आले. यात भांडी व अन्य साहित्याचा समावेश होता. रेडक्रॉस सोसायटीचे जिल्हाभर ३५० हून अधिक सदस्य आहेत. या माध्यमातून अविरत सेवाकार्य सुरू आहे.
सामाजिक सेवेत तत्परता
रेडक्रॉस सोसायटीमार्फत नेक ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करून रूग्णांची व विद्यार्थ्यांची चिकित्सा करणे, प्राथमिक औषधोपचार करणे आदी सेवा रेडक्रॉस संस्थेतर्फे केले जात आहे. एटापल्ली तालुक्यातील कोटमी येथे आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एटापल्ली तालुक्यातील कोटमी गावासह २४ गावात आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात आल्या. यासाठी आरोग्यसेवक, नर्स व तज्ज्ञ डॉक्टरांकडून रूग्णांची तपासणी करण्यात आली. रूग्णांना मोफत गोळ्या, औषधी व इतर सुविधा पुरविण्यात आल्या.