बिंदूनामावलीकडे संस्थांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:20 PM2018-10-22T23:20:10+5:302018-10-22T23:20:47+5:30
आॅनलाईन शिक्षक भरतीबाबत शासनाने पवित्र पोर्टलवर कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान सर्व शिक्षण संस्थांनी आॅनलाईन रोस्टर भरण्याचे आदेशही शासनाने दिले आहे. मात्र यासंदर्भातील माहिती भरण्याची मुदत संपली असताना जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांनी बिंदूनामावलीबाबतची आॅनलाईन माहितीच सादर केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आॅनलाईन शिक्षक भरतीबाबत शासनाने पवित्र पोर्टलवर कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान सर्व शिक्षण संस्थांनी आॅनलाईन रोस्टर भरण्याचे आदेशही शासनाने दिले आहे. मात्र यासंदर्भातील माहिती भरण्याची मुदत संपली असताना जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांनी बिंदूनामावलीबाबतची आॅनलाईन माहितीच सादर केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खासगी अनुदानित व खासगी स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षक भरतीसाठी शासनाने अभियोग्यता चाचणी घेतली. त्यानंतर पवित्र पोर्टलवर कार्यवाही सुरू केली. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही या पोर्टलच्या माध्यमातून शासनाला शिक्षकांची एकही जागा भरता आलेली नाही. आॅनलाईन भरतीला विरोध करणाऱ्या संस्थाचालकांनी रोस्टर भरण्याच्या कामाकडेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महाराष्टÑातील लाखो बेरोजगारांची अस्वस्थता वाढली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०१७ मध्ये शिक्षक भरती आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय जारी केला होता. त्यासाठी डीएड् व बीएड् उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर महिन्यात अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी ही आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. संपूर्ण महाराष्टÑात दोन लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली. मात्र आता या परीक्षेला एक वर्ष पूर्ण होत असतानाही शासनाला भरती प्रक्रिया सुरू करता आलेली नाही. प्रत्यक्ष भरती प्रक्रियेसाठी ‘पवित्र पोर्टल’ तयार करण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शासनाने खर्ची घातला आहे. पुण्याच्या एका संस्थेचे पवित्र पोर्टल तयार केले. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडून पुन्हा या पोर्टलवर स्वत:चे प्रोफाईल भरून घेण्यात आले. त्यानंतर शिक्षण संस्थांकडून रिक्तपदांची बिंदू नामावली अद्यावत करण्याचा टप्पा सुरू करण्यात आला. बिंदूनामावलीबाबतची आॅनलाईन माहिती सादर करण्याचा कालावधी ३ ते १९ आॅक्टोबर २०१७ असा होता. बिंदूनामावलीबाबतची माहिती सादर करण्याचा कालावधी संपुष्टात आला आहे.
संस्थाचालकांनी ३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत बिंदूनामावली (रोस्टर) पोर्टलमध्ये भरावी, असे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले होते. मुदतीनंतरही संस्थाचालकांनी रोस्टर भरले नाही. रोस्टर भरण्यात आले नसल्याने रोस्टर तपासणीची प्रक्रिया कशी करावी, असा प्रश्न शिक्षण विभागाकडे निर्माण झाला आहे.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शरदचंद्र पाटील यांना विचारणा केली असता, आपण बाहेर असल्याने शिक्षण विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यास सांगितले. त्यानंतर कार्यालयात संपर्क साधला असता, पवित्र पोर्टलबाबतची लॉगिंग खुली होत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नेमक्या किती संस्थाचालकांनी बिंदूनामावलीबाबतची आॅनलाईन माहिती सादर केली. याबाबतचा आकडा कळू शकला नाही.
बेरोजगारांचे टेन्शन वाढले
शासनाने पारदर्शक व निकोप पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याबाबत पवित्र पोर्टल व पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. मात्र संस्थाचालकांचा सदर भरती प्रक्रियेला विरोध व सातत्याने असहकार्य लाभत असल्याने शासनाची शिक्षक भरती तुर्तास लांबणीवर पडली आहे. पवित्र पोर्टलवर माहिती भरलेले अनेक डीएड व बीएड उत्तीर्ण विद्यार्थी शिक्षण विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून याबाबत विचारपूस करीत आहेत. मात्र यामध्येही आॅनलाईन अडचणी येत असल्याने भरती प्रक्रिया राबविण्यास आणखी किती विलंब होणार, या विवंचनेत बेरोजगार सापडले आहेत.
त्यातच निवडणूक आचारसंहितेचे वारे राज्यात वाहू लागल्याने आचारसंहिता लागू झाल्यावर ही भरती प्रक्रिया होणार नाही, अशीही भीती बेरोजगाांना सतावत असून जिल्ह्यासह राज्यभरातील बेरोजगारांचे टेंशन वाढले आहे.