धानविक्रीसाठी शेतकऱ्यांची नाेंदणी करण्यास संस्थांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:43 AM2021-09-24T04:43:13+5:302021-09-24T04:43:13+5:30
खरीप धान खरेदी हंगाम २०२१-२२ करिता ३ ते ३० सप्टेंबरदरम्यान शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली. आदिवासी ...
खरीप धान खरेदी हंगाम २०२१-२२ करिता ३ ते ३० सप्टेंबरदरम्यान शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली. आदिवासी विकास महामंडळाकडून सदर जबाबदारी सब एजन्सी असलेल्या आविका संस्थांकडे तीन दिवसापूर्वी सोपविण्यात आली. मात्र आविका संस्था संघटनेने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता आंदोलनाचा पवित्रा घेत ही ऑनलाईन कामे न करण्याचा निर्णय घेतला. ऑनलाईन काम करण्यास मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर ऑनलाईनकरिता पोर्टल नोंदणी स्वीकारत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कुरखेडा आविका संस्थेत काँग्रेस तालुकाध्यक्ष जयंत हरडे यांनी संपर्क साधून ऑनलाईन नाेंदणी करण्याची मागणी केली. मात्र यावेळी त्यांनी स्पष्ट नकार दिला. शेवटी नायब तहसीलदार सुधाकर मडावी व महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांची भेट घेत त्यांच्याकडे शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा निदर्शनास आणून दिली. मागील वर्षी काही शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी न झाल्याने त्यांच्या धानाचा काटा आधारभूत योजनेंतर्गत होऊ शकला नाही. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत यासंदर्भात लवकर पर्यायी व्यवस्था करण्याची तसेच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास संबधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत कुठलीही कार्यवाही न झाल्यास आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष जयंत हरडे, पं.स. सभापती गिरीधर तितराम यांनी दिला.
बाॅक्स
कामे न करण्याची माहिती मिळाली नाही
आविका संस्थेने शेतकऱ्यांची नाेंदणी न करण्याचा निर्णय घेतल्याने उद्भवलेल्या परिस्थितीबाबत उपप्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांची विचारणा केली असता संस्थेकडून अद्याप आपल्या कार्यालयाकडे ऑनलाईन कामे न करण्याबाबत काहीच माहिती दिली नाही. त्यांचे काय म्हणणे आहे हे आपल्याला कळले नाही. मात्र तालुक्यात मागील दोन-तीन दिवसात एकाही शेतकऱ्याची ऑनलाईन नोंदणी झाली नाही. याबाबत संबंधितांकडून आढावा घेत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
230921\img20210923132219.jpg
तहसिल कार्यालयात चर्चा करताना नायब तहसीलदार सूधाकर मडावी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बावणे कांग्रेस ता अध्यक्ष जयंत हरडे यूवक कांग्रेस चे तालुका अध्यक्ष गिरीधर तितराम