बीडीओच्या निर्देशाला ग्रामसेवकाकडून वाटाण्याच्या अक्षता
By Admin | Published: August 1, 2015 01:18 AM2015-08-01T01:18:20+5:302015-08-01T01:18:20+5:30
तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नारगुंडा येथील शाळेजवळ असलेल्या हातपंपासमोरील पाण्याचे डबके नष्ट करण्यासाठी पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, ...
नागरिकांमध्ये रोष : नारगुंडात हातपंपासमोरचे डबके कायम
भामरागड : तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नारगुंडा येथील शाळेजवळ असलेल्या हातपंपासमोरील पाण्याचे डबके नष्ट करण्यासाठी पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश भामरागडचे संवर्ग विकास अधिकारी यांनी जनजागरण मेळाव्यात ग्रामसेवकांना दिले होते. मात्र ग्रामसेवकाने हा निर्देश पायदळी तुडवित कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आली आहे.
नारगुंडा येथील गोटुलजवळ हातपंप आहे. हातपंपाचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. परिणामी हातपंपाचे पाणी जवळच्या खड्ड्यात साचून राहते. या खड्ड्यात दिवसभर डुकरांचा हैदोस राहते.
गढुळ पाण्याची दुर्गंधी येत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हेच सांडपाणी जमिनीत उतरून हातपंपाच्या माध्यमातून तेच पाणी प्यावे लागते. दहा वर्षांपूर्वी लालसू रामा पुंगाटी यांच्या घरासमोरील रस्त्याच्या बाजुला नालीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र रस्त्यावर मुरूम टाकले नाही. त्याचबरोबर रस्तासुध्दा बनविण्यात आला नाही. कालांतराने नाली बुजून रस्ता दिसेनासा झाला. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद पडला आहे. परिणामी खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे.
पोलीस विभागाच्या मार्फतीने नारगुंडा येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भामरागडचे संवर्ग विकास अधिकारीसुध्दा आले होते. गावातील नागरिकांनी या खड्ड्याबाबतची माहिती संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर बीडीओंनी सदर खड्डा बुजवून सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश ग्रामसेवकाला दिले होते.
मात्र याला वर्षाचा कालावधी उलटूनही ग्रामसेवकाने कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी नारगुंडा येथील नागरिक बिरजू पुंगाटी, लालसू परसा, राजू पडालवार, झुरू गोटा, दलसू पुंगाटी, लालू पुंगाटी, दीपक परसा, रमेश पुंगाटी यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)