दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या विशेष शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 01:37 AM2017-06-10T01:37:32+5:302017-06-10T01:37:32+5:30
दिव्यांग विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये यासाठी त्यांना विशिष्ट पद्धतीने शिकविण्यासाठी विशेष शाळांची निर्मिती करण्यात आली.
चार हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिव्यांग विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये यासाठी त्यांना विशिष्ट पद्धतीने शिकविण्यासाठी विशेष शाळांची निर्मिती करण्यात आली. जिल्हाभरात अशा १६ शाळा कार्यरत आहेत. त्यात ७२२ विद्यार्थी शिक्षण घेतात; मात्र गेल्या शैक्षणिक सत्रात केलेल्या पाहणीनुसार प्रत्यक्षात ४८४५ विद्यार्थी दिव्यांग आढळले आहेत. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसोबत त्यांना शिक्षण घेणे कठीण जात असल्यामुळे त्यांच्यासाठी आणखी विशेष शाळांना मंजुरी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सर्वशिक्षा अभियान समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत आहे. समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०१६-१७ मध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १६ शाळांना मंजुरी दिली होती. त्यानुसार विविध उपक्रमही घेऊन गरजेनुसार त्या विद्यार्थ्यांना विविध साहित्याचेही वाटप करण्यात आले. विशेष उपक्रमांमध्ये साहित्य निश्चितीकरण व मोजमाप शिबिर, ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तके, लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तकांचे वाटप, पालक प्रशिक्षण, परीक्षेत सोयी सवलती, परीक्षेमध्ये वाचक-लेखनिक, विशेष तज्ज्ञामार्फत शाळा स्तरावरील शिक्षकांना मार्गदर्शन, विशेष शिक्षकांमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना गृहमार्गदर्शन व शिक्षण, फिजिओथेरपी आदी सुविधा पुरविण्यात आल्या.
यावर्षीही याच पद्धतीचे उपक्रम राबविले जातील. पण दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या पाहता त्यासाठी वाढीव निधी देऊन विशेष शाळांची संख्याही वाढविणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या ४८४५ दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये काही शारीरिक तर काही मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत. यात मानसिकरित्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विशेष शाळांची संख्या आणखी वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
२२७ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
गेल्या शैक्षणिक सत्रात २२७ दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात ७० व्हिल चेअर, ७ तीन चाकी सायकल, २४ कॅलिपर, २ कुबड्या, २ एल्बो क्रॅचेस, १७ रोलेटर, २० श्रवण यंत्र, ६१ अल्पदृष्टी साहित्य, २ पांढरी काठी, २२ एमआर कीट आदी साहित्याचा समावेश होता.
याशिवाय पूर्णत: अंध असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन व लेखनात येणारे अडथळे दूर करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १५४ विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तके आणि लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तके देण्यात आली. त्यात गडचिरोली तालुक्यात १५, आरमोरी ८, देसाईगंज ५, कुरखेडा १६, कोरची १७, धानोरा ३५, चामोर्शी १२, मुलचेरा ७, अहेरी २१, एटापल्ली ४, भामरागड ४ आणि सिरोंचा १० याप्रमाणे वाटण्यात आले.