राष्ट्रपतींच्या दौऱ्याला गुप्तचर यंत्रणेचा ग्रीन सिग्नल, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सुरक्षाकवच
By संजय तिपाले | Published: June 27, 2023 02:06 PM2023-06-27T14:06:03+5:302023-06-27T14:07:20+5:30
जय्यत तयारी : मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री, राज्यपालही येणार
गडचिरोली : राज्याच्या शेवटच्या टोकावरील, मागास, आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित गडचिरोलीत ५ जुलै रोजी गोंडवाना विद्यापीठातील दहाव्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणनेने राष्ट्रपतींच्या दौऱ्यास हिरवी झेंडी दाखवली असून सुरक्षेच्या दृष्टीने उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांचे सुरक्षाकवच तैनात केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
शहरातील गोंडवाना विद्यापीठात ५ जुलैला सकाळी साडेदहा वाजता इमारत भूमिपूजन व दीक्षांत समारंभ मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थितीत राहणार आहेत. जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती गडचिरोलीत येत आहेत. आदिवासी समूहातून आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासीबहुल जिल्ह्यात येत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
राज्यपाल रमेश बैस हे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व प्रभारी कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी विशेष गुणवत्ता प्राप्त व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनींना सुवर्ण पदक, आचार्य पदवी व पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
पाचशेवर पोलिसांचा फौजफाटा
दरम्यान, या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. तीन अपर पोलिस अधीक्षक, पाच उपअधीक्षक, दहा पोलिस निरीक्षक, १५ सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, ५०० अंमलदार, विशेष कृती दल (सी- ६०) च्या पाच तुकड्या व राज्य राखीव दलाची तुकडी असा फौजफाटा तैनात केला जाणार आहे.
दाैऱ्यावर पावसाचे सावट?
राष्ट्रपतींच्या दौऱ्यात सुरक्षेचा प्रश्न नाही, पण पावसाचे सावट आहे. द्रौपदी मुर्मू या हवाईसफर करुनच गडचिरोलीत येणार आहेत. दिल्लीहून हैद्राबाद व तेथून गडचिरोलीला त्या हेलिकॉप्टरमधून येणार आहेत. जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. शिवाय हैद्राबाद ते गडचिरोली अंतरही दूर आहे. त्यामुळे खराब वातावरणाचा दौऱ्यास अडसर तर ठरणार नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.
राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्यासाठी पोलिस यंत्रण सज्ज आहे. सुरक्षा व्यवस्थेत कोठेही कमतरता राहणार नाही, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. हेलिपॅडपासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत चोख बंदोबस्त तैनात केला जाईल.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली