आंतरजिल्हा बदल्यांनी वाढला शिक्षकांच्या रिक्तपदांचा अनुशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:56+5:30
जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विविध समस्यांमुळे शिक्षक त्या भागात जाण्यास तयार नसतात. गेले तरी तेथून लवकर बाहेर पडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आता आंतरजिल्हा बदल्यांमुळे दुर्गम भागातील शिक्षकांचा अनुशेष अजून वाढला आहे. विशेष म्हणजे अजून जिल्ह्यांतर्गत विनंती बदल्या होणे बाकी आहे. त्या बदल्या झाल्यानंतर शिक्षकांची कमतरता चांगलीच जाणवण्याची शक्यता आहे.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. मात्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील जि.प. प्राथमिक शाळांच्या आंतरजिल्हा बदल्या दोन दिवसांपूर्वी केल्या. या आंतरजिल्हा बदल्यांमुळे गडचिरोली जिल्ह्यातून ४९ शिक्षक जिल्ह्याबाहेर गेले, तर केवळ ८ शिक्षक बाहेर जिल्ह्यातून येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे जि.प.शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे.
जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विविध समस्यांमुळे शिक्षक त्या भागात जाण्यास तयार नसतात. गेले तरी तेथून लवकर बाहेर पडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आता आंतरजिल्हा बदल्यांमुळे दुर्गम भागातील शिक्षकांचा अनुशेष अजून वाढला आहे. विशेष म्हणजे अजून जिल्ह्यांतर्गत विनंती बदल्या होणे बाकी आहे. त्या बदल्या झाल्यानंतर शिक्षकांची कमतरता चांगलीच जाणवण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १ हजार ५५० प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच हजारांच्या आसपास शिक्षक कार्यरत आहेत. १५ टक्के बदलीच्या मर्यादेनुसार एकूण शिक्षक संख्येपैकी ६०० शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यामध्ये ५० टक्के प्रशासकीय व ५० टक्के विनंती अशी विभागणी करून बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या शासनाने रद्द केल्या आहेत. मात्र विनंती बदल्या करण्यास आदेशित केले आहेत. त्यामुळे गडचिरोली जि.प. अंतर्गत जवळपास ३०० शिक्षकांच्या विनंती बदल्या होणार आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात सुरूवातीला ३१ जुलैपर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र शिक्षण विभागाकडून प्रक्रिया करण्यास उशीर झाल्याने या बदली प्रक्रियेस १० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जि.प.मध्ये होणारी शिक्षकांची गर्दी टाळण्यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द करण्याचे आदेश देऊन केवळ विनंती बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली. पण जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या विनंती बदल्या अद्यापही केल्या नाहीत. त्यामुळे दुर्गम भागात चार वर्षांपासून कार्यरत शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. बदल्यांची प्रक्रिया लवकर पार पाडावी, अशी मागणी दुर्गम भागातील शिक्षकांकडून होत आहे.
शिक्षकांच्या माहितीची पडताळणी सुरू
जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी संवर्ग १, संवर्ग २ व महिला प्रतिकूल अशा तीन याद्या बदलीपात्र शिक्षकांच्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विनंती बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांच्या माहितीची पडताळणी सुरू आहे. या विनंती बदली प्रक्रियेसाठी शासनाकडून मुदतवाढ मागितली असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली.