मजगीच्या कामांना पसंती

By Admin | Published: February 9, 2016 01:01 AM2016-02-09T01:01:17+5:302016-02-09T01:01:17+5:30

गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

Interest in work | मजगीच्या कामांना पसंती

मजगीच्या कामांना पसंती

googlenewsNext

जिल्हाभरात ९९० कामे सुरू : ४६ हजार ५९३ मजुरांच्या हाताला काम
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे ग्रामसभा मजगीच्या कामांना विशेष पसंती दर्शवित असून एकूण कामांपैकी निम्मी कामे मजगीची केली जातात. ६ फेब्रुवारीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत स्तरावरील एकूण ५६२ कामांपैकी सुमारे २६७ कामे मजगीची सुरू आहेत.
ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला किमान १०० दिवसांचा रोजगार देण्याची हमी आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पीक निघाल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी वाढते.
ग्रामपंचायतस्तरावरच्या कामांचे नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामसभेवर आहे. विविध प्रकारचे काम करता येत असले तरी सर्वाधिक कामे मजगीची मंजूर केली जातात. ६ फेब्रुवारी रोजीच्या अहवालानुसार जिल्हाभरात ग्रामपंचायत स्तरावर ५६२ कामे सुरू आहेत. या कामांवर एकूण ३२ हजार ६६७ मजूर काम करीत आहेत. यामध्ये ७८ रस्त्याची कामे सुरू असून त्यावर ८ हजार ८७७ मजूर काम करीत आहेत. बोडीची ४५ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यावर २ हजार ७३७ मजूर काम करीत आहेत. मजगीची २६७ कामांवर १७ हजार ३३२ मजूर काम करीत आहेत. चार शेततळ्यांच्या कामावर ९० मजूर, ८३ सिंचन विहिरींच्या कामावर ८१७ मजूर, वृक्ष लागवडीच्या ३८ कामांवर १३५ मजूर, १० शौचालय बांधकामावर २१ मजूर, १४ भातखाचर कामांवर ८४३ मजूर, सात मामा तलाव दुरूस्तीवर ८३५ मजूर, तीन सिमेंट बंधारे कामांवर ९९ मजूर व इतर चार कामांवर ७२१ मजूर काम करीत आहेत. एकूण कामांपैकी निम्मी कामे मजगीची असून एकूण मजुरांपैकी निम्मे मजूर मजगीच्या कामावर कार्यरत आहेत. (नगर प्रतिनिधी)

कामाची मागणी वाढली
धान पीक निघाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजुराला व अल्पभूधारक शेतकऱ्याला कामासाठी शोधाशोध करावी लागते. त्यामुळे डिसेंबर महिन्यानंतर रोहयो कामाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सद्य:स्थितीत रोहयोच्या कामावर सुमारे ४६ हजार ५९३ मजूर काम करीत आहेत. जिल्हाभरात ग्रामपंचायतचे ५६२ व यंत्रणास्तरावरील ४२८ कामे सुरू आहेत. रोहयो कामांची मागणी आता तेंदूपत्ता संकलन करण्याच्या अवधीपर्यंत वाढणार आहे.

१०० ग्रामपंचायतींना कामाची प्रतीक्षा
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ३५७ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. मात्र ११० ग्रामपंचायतीमध्ये अजुनही कामे सुरू झालेली नाहीत. या ग्रामपंचायतीमध्येही कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी या ग्रामपंचायतीमधील नागरिकांकडून केली जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Interest in work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.