कौतुकास्पद! शेतकऱ्याने वाटला दोन क्विंटल भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 08:39 PM2020-04-01T20:39:16+5:302020-04-01T20:39:44+5:30
आपल्या शेतात पिकलेली दीड क्विंटल वांगी, २० किलो मिरची, १०-१० किलो फळभाजी आणून गावकऱ्यांच्या स्वाधीन करणाची दानत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने दाखविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आपल्या शेतात पिकलेली दीड क्विंटल वांगी, २० किलो मिरची, १०-१० किलो फळभाजी आणून गावकऱ्यांच्या स्वाधीन करणाची दानत गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने दाखविली आहे.
कोरोनाच्या धास्तीमुळे सगळे घरात आहेत. पिकपाण्याकडे लक्ष नाही. हातातली रक्कम संपत आलेली आहे. अशा स्थितीत भाजीपाल्याची खरेदी टाळण्याकडे लोकांचा कल झुकू लागला आहे. ही परिस्थिती पाहून कोरची तहसील कार्यालयाच्या कोरोना नियंत्रण कक्षाला भजनराव मोहुर्ले व पंचकुला मोहुर्ले या शेतकऱ्याने आपल्या शेतातील दीड क्विंटल वांगी, २० किलो मिरची, १०-१० किलो फळभाजी हा ठेवा बुधवारी दुपारी नेऊन बहाल केला.
देशांमध्ये लॉक डाऊन झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये भाजीपाल्याचे दर खूप जास्त वाढलेले आहे अशा मध्येच त्यांनी आपले भाजीपाल्याचे पीक पूर्णत: गोरगरिबांसाठी दान दिलेले आहे. शासन आपल्या स्तरावरून गरजू लोकांसाठी अन्नधान्याची व्यवस्था आपल्या स्तरावरून करतच आहे पण गावातील सर्वसामान्य सुद्धा अशाच पद्धतीने हात पुढे करून गरजू लोकांची मदत करावी असे कोरची येथील तहसीलदार सीआर भंडारी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.