भेंडाळा परिसरातील अंतर्गत रस्ते खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 05:00 AM2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:00:50+5:30
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत उदासीन असतात. त्यामुळे येथील रस्त्यांची चाळण होते. कुठे तरी त्यावर डांबर आणि खडी दिसत असते. पावसाळ्यात मात्र या भागातील अंतर्गत रस्त्यांना जोरदार फटका बसून दुरवस्थेत भर पडते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा : मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे नवीन रस्त्यांचीही वाट लागली. खड्डेमय झालेल्या रस्त्यांची डागडुजी यावर्षीच्या उन्हाळ्यात करणे अपेक्षित होते. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या भेंडाळा परिसरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याशिवाय गावातील अंतर्गत रस्ते दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांना खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधीही या समस्येबाबत उदासीन असतात. त्यामुळे येथील रस्त्यांची चाळण होते. कुठे तरी त्यावर डांबर आणि खडी दिसत असते. पावसाळ्यात मात्र या भागातील अंतर्गत रस्त्यांना जोरदार फटका बसून दुरवस्थेत भर पडते. भेंडाळा परिसरातील अनेक अंतर्गत रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. तेलतून तुकूम ते एकोडी मार्ग तसेच वेलतूर तुकूम ते कळमगाव, सगनापूर ते नवेगाव माल, कान्होली ते मुरखळा, भेंडाळा ते रामाळा, दोटकुली बसस्टॉप ते वाघोली, भेंडाळा ते वेलतुर तुकूम, फोकुर्डी ते नवेगाव माल या सर्व रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर डांबर टाकल्यानंतर चाळण होईपर्यंत लक्ष दिले जात नाही. रस्त्यांबाबत लोकांच्या जेव्हा तक्रारी येतात तेव्हाच प्रशासनाला जाग येते. या परिसरातील काही रस्त्यांवर तर अद्याप एकदाही डांबर पडलेले नाही. असे रस्ते सुध्दा या परिसरात बघायला मिळतात. अशी गंभीर परिस्थिती ग्रामीण भागातील रस्त्यांची आहे. या भागांतील अगदी थोडेच रस्ते चांगले आहेत पण ते देखील दरवर्षीच्या पावसाळ्यात उखडून जाण्याची भीती असते. या गावांतील अंतर्गत रस्तेदेखील मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण रस्त्यांचे नव्याने खडीकरण करावे, अशी मागणी भेंडाळा परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अरूंद रस्त्यांच्या कडा भरण्याची मागणी
भेंडाळा परिसरातील ग्रामीण भागात जाणारे रस्ते अरूंद आहेत. या रस्त्यांच्याही कडा खोलगट आहेत. मात्र कडांवर मुरूम टाकण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मार्र्कंडाकडे जाणाऱ्या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यांच्या कडा भरणे आवश्यक आहे. आधीच अरूंद असलेले रस्ते वाहतुकीस अडसर ठरत असतानाच कडा खोलगट झाल्याने अपघाताचा धोका आहे.
परिसरातील रस्त्यांच्या वळणावर दुतर्फा झुडपे वाढली असल्याने विरूद्ध दिशेने येणारे वाहन दृष्टीस पडत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेली विशेषत: वळणावरील झुडपे तोडणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून झुडपे तोडावी, अशी मागणी होत आहे.