शिक्षकांच्या प्रशिक्षणाला इंटरनेटचा खाेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:37 AM2021-02-24T04:37:58+5:302021-02-24T04:37:58+5:30
कोरची : तालुक्यातील ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण, पुणेद्वारा आयुष्यमान भारत आरोग्य ऑनलाइन प्रशिक्षणाला सोमवारपासून सुरुवात झाली ...
कोरची : तालुक्यातील ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण, पुणेद्वारा आयुष्यमान भारत आरोग्य ऑनलाइन प्रशिक्षणाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र तालुक्यात एकमेव बीएसएनएलचे इंटरनेट कासव गतीने सुरू असून, इंटरनेटच्या अभावामुळे शिक्षकांना प्रशिक्षण घेणे अवघड झाले आहे.
कोरची तालुक्यातील सहावी ते बारावीमधील १३ ते १९ वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हे ऑनलाइन शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. किशोरवयीन मुलामुलींमध्ये होणाऱ्या शरीरातील अवयवात वाढ व बदल त्यांच्या नवनवीन प्रक्रियेबद्दल माहिती देणे आज शिक्षणामध्ये गरजेचे झाले आहे. किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी व होणारा त्रास, आवाजात बदल, शरीरात वाढ व मुलांमधील स्वप्नदोषसारखे प्रकार आहेत. ह्या वयातील विद्यार्थी आपल्या आईवडिलांशी सहसा चर्चा करत नाहीत. लपवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मित्रांकडे याबाबत सांगण्याचा प्रयत्न करतात. शिक्षकांनाही सांगत नाही. त्यामुळे शिक्षकांनी या ऑनलाइन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण घेऊन पास होऊन पुढे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायवयाचे आहे. या प्रशिक्षणामध्ये पास झालेल्या शिक्षकांना प्रमाणपत्र मिळणार असून, जे शिक्षक ऑनलाइन प्रशिक्षणानंतर पास होतील त्याच शिक्षकांना प्रमाणपत्र मिळेल. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल शिक्षणासाठी साहित्यही भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कोरची तालुक्यामध्ये सहावी ते बारावीचे जिल्हा परिषद शाळा वीस, तर शासकीय आश्रमशाळा पाच व खासगी शाळा अठरा अशा एकूण ४३ शाळा आहेत. त्यामध्ये एकूण कार्यरत शिक्षक ३१४ असून दोन हजार ६५९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या आयुष्यमान भारत आरोग्य प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक शाळांमधील एक मुख्याध्यापक व दोन सहायक शिक्षक ऑनलाइन प्रशिक्षण घेणे सुरू आहे. मात्र तालुक्यातील एकमेव असलेला बीएसएनएल नेटवर्कवर इंटरनेट चालत नसून प्रशिक्षण घेणे कठीण जात आहे.
तसेच येथील शिक्षकांना शासनाच्या येत असलेल्या विविध ऑनलाइन शिक्षणाच्या उपक्रमापासून वंचित राहावे लागत आहे. शिक्षकांना जर ऑनलाइन प्रशिक्षण मिळत नसेल तर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे शिक्षण देऊ शकणार काय, आज किशोरवयीन विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षणाची गरज आहे. त्यांच्या शरीराच्या अवयवातील बदल व त्या संबंधातील सर्व शिक्षण जर शिक्षकच इंटरनेटअभावी शिक्षण घेण्यास मागे राहत असतील तर विद्यार्थी मागे राहणार नाही काय, असा सवाल येथील पालक करीत आहेत.