धानपीक रोवणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:41 AM2018-06-30T01:41:10+5:302018-06-30T01:42:17+5:30
सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपºहे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसांपासून आपल्या शेतजमिनीत धानपऱ्हे टाकले. सदर पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने तसेच २७ व २८ जूनला जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे वैरागड परिसरात धानपीक रोवणीच्या कामास प्रारंभ झाला.
पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना उलटला तरी मान्सून सक्रीय न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. ८ जून रोजी झालेल्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगरणी व वखरणीची कामे पूर्ण केली. तसेच बाह्य मशागतीचे काम आटोपून आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम पूर्ण केले. मात्र त्यानंतर पावसाचा पत्ता नसल्याने धान पऱ्हे करपण्याच्या मार्गावर होते. असे असताना २७ जून रोजी वैरागड परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. समाधानकारक पावसाने शेतकरी सध्यातरी आनंदीत असून खरीप हंगामाच्या तयारीला जोमाने भिडले आहे. वैरागड परिसरात शासनाच्या धडक सिंचन व नरेगा योजनेतून सिंचन विहिरींची कामे मोठ्या प्रमाणात झाली. तसेच अनेक शेतकºयांनी कृषिपंपाची जोडणी केली. त्यामुळे सिंचनाची सुविधा या भागात झाली. या सिंचन सुविधेच्या भरवशावर वैरागड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच धानपऱ्हे टाकले. हे पऱ्हे रोवणीयोग्य झाल्याने काही शेतकऱ्यांनी रोवणीचे काम हाती घेतले आहे. या कामातून अनेक महिला व पुरूष मजुरांना रोजगार मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतशिवारात पाणी साचले आहे. पऱ्हेही रोवणीयोग्य झाल्याने येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा पाऊस बरसल्यास बहुतांश गावातील रोवणीचे काम सुरू होणार आहे.