अवैध गर्भपाताचे प्रमाण वाढले
By admin | Published: March 16, 2017 01:13 AM2017-03-16T01:13:43+5:302017-03-16T01:13:43+5:30
दर हजारी मुलांमागे ९०० अथवा ९५० मुली जन्माला आल्यास मुला/मुलींचा लिंग गुणोत्तर योग्य राहतो.
जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घटला : जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती
गडचिरोली : दर हजारी मुलांमागे ९०० अथवा ९५० मुली जन्माला आल्यास मुला/मुलींचा लिंग गुणोत्तर योग्य राहतो. शासनाचेही असेच धोरण आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या गर्भपाताचे प्रमाण वाढले असून मुलींचा जन्मदर घटला आहे. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे आता कठोर पाऊले उचलण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, डॉ. अरूण शेंद्रे उपस्थित होते. कोरची, भामरागड, धानोरा, सिरोंचा या तालुक्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. इतर आठ तालुक्यात मुलींचा दर मुलांच्या तुलनेत ९५० च्या वर आहे. कोरची तालुक्यात दर हजारी मुलांमागे ७०५, भामरागड ७६४, धानोरा ७२४ व सिरोंचा ८९७ असा मुलींचा जन्मदर आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भंडारी यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यात १ हजार मुले जन्म घेत आहेत. मात्र वर्षाला १ हजार पेक्षा कमी मुली जन्म घेत आहेत. त्यामुळे मुलींचे लिंग गुणोत्तर कमी आहे, असेही ते म्हणाले. लिंग परीक्षण व अवैधरित्या गर्भपातास आळा घालणे गरजेचे असून तसे प्रयत्न आरोग्य विभागातर्फे होतील, असे डॉ. खंडाते यांनी सांगितले.
शासकीय व खासगी रुग्णालयांची तपासणी होणार
पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी याच कायद्याअंतर्गत १५ मार्च ते १५ एप्रिल या एक महिन्याच्या कालावधीत जिल्हास्तरीय समितीमार्फत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाची कडक तपासणी होणार आहे. शिवाय सोनोग्राफी सेंटर, प्रसूती विभाग व पॅथालॉजीची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांनी दिली. रुग्णालयात पॅनलवर कोणते डॉक्टर आहेत, उपलब्ध औषधी साठा, सोयीसुविधा, अवैध गर्भपात होते काय, लिंग परीक्षण, तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी आहेत काय आदींबाबतची सखोल तपासणी समितीमार्फत करण्यात येणार आहे.