विद्यार्थ्यांच्या मॉडेलमधून नाविण्याचा अविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:12 PM2019-01-22T23:12:21+5:302019-01-22T23:13:36+5:30
विद्यार्थी व शिक्षकांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी गडचिरोली येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयात सोमवारपासून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थी व शिक्षकांनी अनेक नाविण्यपूर्ण मॉडेल आणून त्याचे सादरीकरण केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यार्थी व शिक्षकांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी गडचिरोली येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयात सोमवारपासून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थी व शिक्षकांनी अनेक नाविण्यपूर्ण मॉडेल आणून त्याचे सादरीकरण केले जात आहे.
विज्ञान प्रदर्शनात जिल्हाभरातून १४२ मॉडेल राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात १०३ मॉडेल आले आहेत. काही मॉडेल हे जुन्याच मॉडेल व तंत्रज्ञानाचे अनुकरण करणारे आहेत, तर काही मॉडेलची संकल्पना चांगली असली तरी प्रत्यक्ष कृती व वापरात त्या संकल्पनांचा वापर करणे शक्य नसल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीतून दिसून आले. काही शिक्षक व विद्यार्थ्यांनी मात्र नाविण्यपूर्ण संकल्पना राबवून कमी किमतीत अत्यंत प्रभावी, उपयोगी मॉडेल सादर केले.
अध्यापन करताना शिक्षकांनी शैक्षणिक साहित्याचा वापर करावा, हे अनेकवेळा सांगितले जात असले तरी बहुतांश शिक्षक पारंपरिक पद्धतीनेच अध्यापन करतात. या शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील, असे शैक्षणिक साहित्य गडअहेरी येथील संजय कोंकमुट्टीवार या शिक्षकाने, रांगी येथील कुंदन चापले या विद्यार्थ्याने तयार केले. सदर शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाला भेट देणाºयांचे लक्ष वेधून घेत होते. या शैक्षणिक साहित्यांविषयीची माहिती पालक, विद्यार्थी व इतर जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक जाणून घेत होते. त्यामुळे या मॉडेलभोवताल दिवसभर गर्दी होती.
उत्तर गिळणाऱ्या पेटीतून विद्यार्थ्यांना अंक व भाषाज्ञानाचे धडे
अहेरी तालुक्यातील गडअहेरी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय कोंकमुट्टीवार यांनी विद्यार्थ्यांना हसतखेळत अंकज्ञान, भाषाज्ञान व्हावे, यासाठी अनेक नाविण्यपूर्ण शैक्षणिक साहित्य तयार केले आहेत. यामध्ये उत्तर गिळणारी पेटी, एटीएम, गळ, फलकावरील चुंबक, शब्दांचे ठोकळे, चक्र आदींचा समावेश आहे.
उत्तर गिळणाऱ्या पेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंकज्ञान देताना एका पॉकेटमध्ये चार कार्ड ठेवले राहतात. पॉकेटवर प्रश्न लिहिला राहतो व त्याचे एका कार्डवर योग्य उत्तर, इतर तीन कार्डवर चुकीचे उत्तर राहते. विद्यार्थी चारही कार्ड पेटीत टाकतो. चुकीचे उत्तर लिहिलेले कार्ड पेटीतून बाहेर पडतात. मात्र योग्य उत्तर असलेला कार्ड पेटी गिळंकृत करते. तो कार्ड बाहेर येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याला योग्य उत्तर कळते. या पेटीमध्ये चुंबक बसविला राहतो. योग्य उत्तराच्या कार्डला लहानशी लोखंडाची प्लेट लावली राहते. त्यामुळे तो कार्ड पेटीमधील चुंबकाला अडकतो.
चुंबक लावलेला गळ एका पेटीतील कार्ड उचलतो. ते कार्ड विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी दिले जातात.
एटीएम पेटीत कार्ड टाकताच एखाद्या शिक्क्याप्रमाणे असलेले गोल आकाराचे कार्ड बाहेर पडते, त्यावरून विद्यार्थ्याला गणितीय, भाषेच्या क्रिया सांगितल्या जातात.
तीन ठोकळे तयार केले असून एका ठोकळ्यावर नाम, दुसºया ठोकळ््यावर कर्म, तिसºया ठोकळ्यावर क्रियापद लिहिले आहे. इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेचे ठोकळे आहेत. विद्यार्थी ठोकळा पलटवून वाक्य तयार करतो. या तीन ठोकळ््यांच्या मदतीने शेकडो वाक्य तयार होतात.
गणितीय क्रिया करणारी पेटी
धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रांगी येथील सहाव्या वर्गातील कुंदन उमाजी चापले या विद्यार्थ्याने एच.डी.काटेंगे या शिक्षकाच्या मार्गदर्शनात गणितीय क्रिया करणारी पेटी तयार केली आहे. या पेटीच्या मदतीने गंमतजंमत करत विद्यार्थी गणितीय क्रिया पूर्ण करतात. विशेष म्हणजे गणितीय क्रियांचे उत्तर विद्यार्थ्यांना सापडत असल्याने विद्यार्थी पुन्हा आनंदी होऊन गणित शिकतात. रटाळ वाटणारे गणित या पेटीमुळे आनंदी विषय होण्यास मदत होते. विशेष म्हणजे केवळ १५० रूपयांत सदर पेटी तयार झाली आहे. पालकाला ही पेटी घरीही तयार करणे शक्य आहे.
भागाकार करताना संख्या दर्शविलेल्या डाव्या बाजूला ज्या संख्येला भागायचे आहे तेवढ्या पट्ट्या लावल्या जातात. भाजक असलेल्या पट्ट्यांचे ग्रुप तयार करून ते बाजूच्या कपात ठेवले जातात. पट्ट्या संपल्यानंतर उत्तर तयार होते.
बेरजेची क्रिया करताना दोन डब्ब्यातून काचेच्या गोळ्या टाकल्या जातात. या गोळ्या खालच्या बाजूस जमा होतात. यामुळे विद्यार्थ्याला बेरजेचे उत्तर कळते.
वजाबाकीची क्रिया करताना एकत्रित गोळ्या वर टाकल्या जातात. त्यातून जेवढ्या गोळ्या वजा करायच्या आहेत, तेवढ्या वेळा कार्ड स्वाईप केल्या जातात. वर शिल्लक असलेल्या गोळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्याला उत्तर मिळते.
शेतकरी करू शकतील बायोगॅसची निर्मिती व विक्री
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ९० टक्के लोकसंख्या शेती व शेतीवर आधारित व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र दिवसेंदिवस शेती हा तोट्याचा व्यवसाय ठरत चालला असल्याने शेतकºयांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. मात्र याच शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकरी संपन्न होऊ शकतो. अशा प्रकारचा मॉडेल चामोर्शी येथील डिज्नीलँड अॅण्ड प्रेसिडेन्सी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी रवींद्र बारसागडे याने तयार केला आहे. त्याला महेश देशमुख व सुजाता काटवलकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.
पशुधनाच्या विष्ठेपासूून बायोगॅस तयार होते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेकांकडे बायोगॅस आहेत. मात्र हे बायोगॅस केवळ घरगुतीसाठी वापरले जातात. बायोगॅसचा मोठा प्लॅन्ट तयार केल्यास बायोगॅस साठवून त्याची सभोवतालच्या नागरिकांना विक्री करणे शक्य आहे. तयार होणारी बायोगॅस एका टँकमध्ये साठविली जाते. साठविलेली बायोगॅस सिलिंडरमध्ये भरून तिची विक्री करता येते. बायोगॅसमधून बाहेर पडणारे शेण सेंद्रिय खत म्हणून वापरता येणे शक्य आहे.
पवन ऊर्जेपासून वीज निर्मिती करून घरगुती कामासाठी त्या विजेचा वापर करणे शक्य आहे. एकदा पवन ऊर्जा सयंत्र बसविल्यानंतर संबंधित कुटुंबाला मोफत वीज उपलब्ध होते. त्यामुळे खर्चात बचत होण्यास फार मोठी मदत होते. ही वीज अत्यंत कमी खर्चात तयार होते. याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हा मॉडेल तयार केला.