अहेरीत ९५ यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:50 PM2018-12-22T23:50:15+5:302018-12-22T23:50:43+5:30

येथील उपजिल्हा रुग्णालयात १० ते १३ डिसेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात चार दिवसांत ९५ रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे विविध आजारांनी ग्रस्त त्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

Inverted 9 5 successful surgery | अहेरीत ९५ यशस्वी शस्त्रक्रिया

अहेरीत ९५ यशस्वी शस्त्रक्रिया

Next
ठळक मुद्देतीन दिवसीय शिबिर : विविध आजारांच्या १ हजार ३४६ रुग्णांची तपासणी

ए.आर.खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : येथील उपजिल्हा रुग्णालयात १० ते १३ डिसेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात चार दिवसांत ९५ रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे विविध आजारांनी ग्रस्त त्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तीन दिवसीय आरोग्य शिबिरात एकूण १ हजार ३४६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६५२ पुरूष व ६९४ महिलांचा समावेश आहे. यापैकी १८३ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. १४३ जणांची दंत तपासणी करण्यात आली. ६० रुग्णांचा एक्स-रे काढण्यात आला. ८१ रुग्णांना ईसीजी सेवेचा लाभ देण्यात आला. विविध प्रकारच्या १ हजार ५४० रुग्णांच्या चाचण्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आल्या.
या शिबिरासाठी अहेरीच्या बाहेरून जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, बालरोग तज्ज्ञ डॉ.धुर्वे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा सर्जन डॉ.माधुरी किलनाके, डॉ.मेश्राम, सर्जन डॉ.तुषार डहाके, ईएनटी तज्ज्ञ डॉ.खोब्रागडे, दंत सर्जन डॉ.यादव, बालरोग तज्ज्ञ डॉ.पेंदाम, भूलतज्ज्ञ डॉ.दर्शना गणवीर, डॉ.प्रियंका गेडाम, सर्जन डॉ.अविनाश बोकडे तसेच अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी, सर्जन डॉ.अमोल पेशट्टीवार, बालरोग तज्ज्ञ डॉ.आर.एल.हकीम, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अनंत जाधव, भूलतज्ज्ञ डॉ.अश्लेषा गडबईल, वैद्यकीय अधिकारी संजय उमाटे, डॉ.दीपक कातकडे, डॉ.चेतन इंगोले, डॉ.नितेश नाकट, डॉ.प्रतिभा पेंदाम आदींनी शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराच्या रुग्ण तपासणीत महत्त्वाची भूमिका बजावली. आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ.रूबिना अन्सारी, डॉ.लोचन श्रीखंडे, डॉ.दीपक मडावी, डॉ.अनुपमा बिश्वास यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाच्या इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सदर शिबिरादरम्यान अहेरीच्या उपविभागीय अधिकारी डॉ.इंदुराई जाखड यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.
अशा झाल्या शस्त्रक्रिया
आरोग्य शिबिरात तपासण्यात आलेल्या एकूण १ हजार ५४० रुग्णांपैकी शस्त्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यात ९५ रुग्णांची निवड करण्यात आली. या ९५ रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये हर्नियाचे १३ रुग्ण, सिजर प्रसुती १२, गाठीच्या शस्त्रक्रिया ४, हायड्रोसिल १८, गर्भाशयाची शस्त्रक्रिया ४, शासनमान्य गर्भपात २, पुरूषाची नसबंदी २५, महिला नसबंदी २, चिरा शस्त्रक्रिया ३, गर्भद्वाराची शस्त्रक्रिया १, पोटातील गाठी काढणे ४, शासनमान्य उर्वरित गर्भपात २, पुन्हा टाके मारणे १ आणि मूतखड्याची शस्त्रक्रिया ३ आदींचा समावेश आहे. अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहात या सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
२६ डिसेंबरला ५२ रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया
अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शिबिर घेऊन पहिल्या टप्प्यात विविध आजाराने ग्रस्त ९५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आता दुसऱ्या टप्प्यातील शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन २६ डिसेंबर रोजी बुधवारला करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात ५२ रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने दोन दिवसांपासून संबंधित रुग्णांच्या आवश्यक सर्व प्राथमिक तपासण्या पूर्ण करण्यात येत आहेत.
शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले
शासनाच्या नव्या धोरणानुसार अहेरीसारख्या आदिवासीबहुल भागात तज्ज्ञ सर्जन डॉक्टर उपलब्ध होत असल्याने पूर्वीच्या तुलनेत आता अहेरी उपविभागात शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढले आहेत.

Web Title: Inverted 9 5 successful surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य