टीएसके रेड्डीच्या गैरप्रकाराची चौकशी करा
By admin | Published: August 3, 2015 01:11 AM2015-08-03T01:11:09+5:302015-08-03T01:11:09+5:30
गडचिरोली वनवृत्ताचे मुख्यवनसंरक्षक (प्रादेशिक) टीएसके रेड्डी यांनी मागील चार वर्षाच्या काळात वन विभागात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे.
देहत्याग आंदोलन : विजय खरवडे यांची मागणी
गडचिरोली : गडचिरोली वनवृत्ताचे मुख्यवनसंरक्षक (प्रादेशिक) टीएसके रेड्डी यांनी मागील चार वर्षाच्या काळात वन विभागात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. हजारो रूपयांची अवैध बांबू तोडही त्यांच्या कार्यकाळात झाली. या संदर्भात अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलकाकडून शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर शासनाने आता त्यांची गडचिरोली येथून नागपूर येथे बदली केली आहे. टीएसके रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे नेते विजय खरवडे यांनी केली आहे. शासनाने रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास गडचिरोली येथे देहत्याग आंदोलन करण्याचा इशाराही खरवडे यांनी दिला आहे. शासनाकडे आपणही या पूर्वी रेड्डी यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाचे विविध पुरावे सादर केलेले आहेत. वनमंत्र्यांनी आपल्याला चौकशीचे आश्वासनही दिले, अशी माहिती खरवडे यांनी लोकमतला लेखी स्वरूपात दिली आहे. (प्रतिनिधी)