एटापल्ली वनपरिक्षेत्राच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:51+5:302021-07-16T04:25:51+5:30
आलापल्ली : एटापल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एच. राठोड यांच्या कार्यकाळात झालेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत सखोल ...
आलापल्ली : एटापल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एच. राठोड यांच्या कार्यकाळात झालेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी मुख्यमंत्री तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भामरागड वन विभागातील एटापल्ली वनपरिक्षेत्रात एस. एच. राठोड वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून रुजू झाले. त्या तारखेपासून आजपर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेली एकूण मंजूर कामे व त्या कामावरील करण्यात आलेला खर्च नियमानुसार करण्यात आला आहे काय. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण बिटाचे बीट निरीक्षण करून त्या बिटातील वनजमिनीवरील अवैध अतिक्रमण, अवैध उत्खनन, अवैध वृक्षतोड, वनरक्षक, वनपाल व अन्य वन कर्मचाऱ्यांची मुख्यालयी उपस्थिती, त्यांच्या कार्यकाळात कामावर लावण्यात आलेले एकूण मजूर, त्या मजुरांचे प्रत्येक व्हाऊचर तपासून घ्यावे. त्यांच्या सह्या वा अंगठे तपासावेत. मजुरांनी प्रत्यक्ष किती दिवस कामे केली व त्यांना कामावर किती दिवस दाखविले, मोजमाप पुस्तिका, प्रत्येक मजुराची बँक पुस्तिका तपासावी. नियमानुसार करण्यात आलेली कामे याची खात्री करणे व त्यांच्या कालावधीत करण्यात आलेली खोदतळे, एकूण साहित्य खरेदी, रोपवन लागवड व त्यावरील निंदणीचे सगळे व्हाऊचर यासह अन्य मुद्द्यांवर एटापल्ली वनपरिक्षेत्रातील आरएफओ एस. एच. राठोड यांच्या कार्यकाळातील त्यांच्या कार्यक्षेत्रात झालेेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केली आहे. महिनाभरात चौकशीला सुरुवात न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.