गणवेश खरेदीची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:36 AM2018-04-19T01:36:27+5:302018-04-19T01:36:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : गडचिरोली वनवृत्तातील वनपाल व वनरक्षक यांच्यासाठी गणवेश खरेदीसाठी राबविलेली प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वनपाल व वनकर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शेरेकर यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वनपाल व वनकर्मचारी यांना शासनाकडून गणवेश व इतर महत्त्वाचे साहित्य खरेदी करण्यासाठी वार्षिक ५ हजार १६७ रूपये मंजूर केले आहेत. २०१७-१८ या वर्षात गणवेश व साहित्य खरेदी करण्याची प्रक्रिया मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने नियबाह्यरित्या राबविली आहे. सुमारे ६१ लाख ७४ हजार ५६५ रूपयांची खरेदी असतानाही ई-निविदा काढण्यात आली नाही. गणवेश साहित्य खरेदी समितीमध्ये वनरक्षक, वनपाल यांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आले नाही. साहित्याचा दर्जा व गुणवत्ता ठरविताना कोणते निकष लावले, हे सुद्धा कळले नाही. सदर प्रक्रिया संशयास्पद असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.