‘लोहखनिज प्रकल्प जिल्ह्यातच हवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:11 AM2018-02-28T01:11:50+5:302018-02-28T01:11:50+5:30
गडचिरोली हा जिल्हा वनाने व्यापलेला असल्याने येथे वनावर आधारित उद्योगांची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकते.
ऑनलाईन लोकमत
देसाईगंज. : गडचिरोली हा जिल्हा वनाने व्यापलेला असल्याने येथे वनावर आधारित उद्योगांची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र येथील नागरिकांना कायम अंधारात ठेवून आपली पोळी शेकण्याचे काम काही लोकांनी केले आहे. सुरजागड येथील लोहखनिजावर आधारित शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी कुणाचेही दुमत नाही, मात्र हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यÞातच उभारण्यात यावा, अशी अपेक्षा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
सुरजागड येथील लोह खनिज साठ्याच्या आधारावर या जिल्ह्यात लोह प्रकल्प उभारल्यास तो गडचिरोली जिल्ह्याच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरू शकेल. मात्र हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर उभारून सुशिक्षित बेरोजगार व स्थानिक नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. याबाबत आपण जातीने शासनाकडे पाठपुरावा या मागासलेल्या जिल्ह्यÞाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे पटोले म्हणाले.
वाहतुकीच्या सोयीसाठी देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वेमार्ग युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याचे सुतोवाच करु न येथील जनतेची दिशाभूल केल्या जात आहे. वास्तवात विद्यमान शासनाने चामोर्शी तालुक्यातील कोनसरी परीसरातील ६५ हेक्टर जमीन उद्योजकांना फुकटात देऊन रेल्वे मार्गाचा प्रश्न अधांतरीच ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.
रेल्वेमार्गासंदर्भात पर्यावरणाचा प्रश्न उभा ठाकला असल्याने भविष्यातही देसाईगंज-गडचिरोली रेल्वेमार्ग होईल किंवा नाही याची शास्वती नसल्याचा आरोप त्यांनी केला. लॉयड् कंपनीचा लोह प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे होईल अशा रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज परिसरात उभारण्यात यावा, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला माजी खासदार मारोतराव कोवासे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम उपस्थित होते.