अनियमित पावसाने धानाचे पऱ्हे करपण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:24 AM2021-07-08T04:24:25+5:302021-07-08T04:24:25+5:30
गुडीगुडम : अहेरी तालुक्यातील गुडीगुडम परिसरात गेल्या काही वर्षांपासून सिंचन सोईसुविधांचा अभाव आहे. असे असतानासुद्धा नाले, लहान बोड्या व ...
गुडीगुडम : अहेरी तालुक्यातील गुडीगुडम परिसरात गेल्या काही वर्षांपासून सिंचन सोईसुविधांचा अभाव आहे. असे असतानासुद्धा नाले, लहान बोड्या व तलाव व निसर्गाच्या भरोशावर या परिसरात हलक्या व जाड प्रतीचे धान मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. मात्र पावसाने दांडी मारल्याने या परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत.
सध्या स्थितीत हलक्या प्रतीचे धान पऱ्हे व पेरणी ७० टक्के शेतकऱ्यांनी केले आहे. मात्र धान पेरणी झाल्यावर पावसाने दांडी मारल्याने शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सिंचन सोईसुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारच्या सिंचन सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. या भागात ७० टक्के धान पऱ्हे पेरणी झाली आहे. धान पऱ्हे वाचविण्याची धडपड शेतकरी बांधव करीत आहेत. त्यासाठी नाला किंवा बोडीचे पाणी ऑईल इंजिनद्वारे दिले जात आहे. पाऊस कमी झाल्याने काही ठिकाणचे धान उगवले नाही.