तलाव नविनीकरणाच्या कामात अनियमितता
By admin | Published: May 2, 2017 01:10 AM2017-05-02T01:10:54+5:302017-05-02T01:10:54+5:30
आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील गिलगाव जमी येथील सर्वे क्रमांक २५ मधील २०.२५ हेक्टर आर जागेत सुरू असलेल्या...
कारवाईचे संकेत : आमदारांनी केली पाहणी
गडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील गिलगाव जमी येथील सर्वे क्रमांक २५ मधील २०.२५ हेक्टर आर जागेत सुरू असलेल्या तलाव नविनीकरणाच्या कामाची पाहणी रविवारी केली. दरम्यान नागरिकांच्या तक्रारीनुसार सदर तलाव नुतनीकरणाचे काम लोकसहभागातून होत नसल्याचे तसेच या कामात बरीच अनियमितता असल्याचे त्यांना आढळून आले.
राज्य शासनाने मंजूर केलेल्या या कामासाठी जलसंधारण विभागाकडून एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. सदर तलावाचे योग्यरित्या काम झाल्यास या भागातील जवळपास दीडशे एकर शेतजमिनीला सिंचनाची सोय होईल, असे आ. डॉ. होळी यांनी सांगितले. नागरिकांच्या सदर कामाच्या तक्रारीची दखल घेऊन जलसंधारण विभागाचे अभियंता अप्पासाहेब यांना कामाच्या ठिकाणी बोलावून आ. डॉ. होळी यांनी पाहणी केली. यावेळी उपसरपंच हरिश्चंद्र आलाम, पांडुरंग मोंगरकर उपस्थित होते. या कामाची तक्रार शासनाकडे करणार असल्याचे आ. डॉ. होळी यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)