तलावाच्या दुरूस्तीत सिंचन विभागाने मारली मेख
By admin | Published: April 18, 2017 12:57 AM2017-04-18T00:57:30+5:302017-04-18T00:57:30+5:30
कमलापूर येथील तलावाची दुरूस्ती करणे आवश्यक असतानाही चामोर्शी येथील पाटबंधारे उपविभागाने कार्यकारी अभियंता चंद्रपूर यांना पाठविलेल्या अहवालात ....
कमलापूरचे ग्रामस्थ संतप्त : दुरूस्तीची गरज नसल्याचा अहवाल पाठविला
कमलापूर : कमलापूर येथील तलावाची दुरूस्ती करणे आवश्यक असतानाही चामोर्शी येथील पाटबंधारे उपविभागाने कार्यकारी अभियंता चंद्रपूर यांना पाठविलेल्या अहवालात कमलापूर तलावाची दुरूस्ती करण्याची अजिबात आवश्यकता नसल्याची मेख मारून ठेवली आहे. अशा प्रकारच्या अभिप्रायामुळे तलाव दुरूस्तीत अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे चामोर्शी पाटबंधारे उपविभागाविषयी कमलापूर येथील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कमलापूर नवीन तलावातील मागील अनेक वर्षांपासून गाळ उपसण्यात आला नाही. त्यामुळे या तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. याचा सिंचनावर परिणाम पडत चालला आहे. तलावाचे खोलीकरण करून कॅनलची दुरूस्ती करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी राज्याचे वित्तमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. वरिष्ठस्तरावरून चामोर्शी पाटबंधारे उपविभाग कार्यालयाला विचारणा झाली असता, या तलावाच्या प्रत्यक्ष सिंचन क्षमतेच्या तुलनेत मागील पाच वर्षात अधिकचे सिंचन झाले आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता केवळ ३३४ हेक्टर आहे. असे असतानाही २०११-१२ मध्ये ४३६ हेक्टर, २०१२-१३ मध्ये ४४० हेक्टर, २०१३-१४ मध्ये ४९२ हेक्टर, २०१४-१५ मध्ये ४३८ हेक्टर, २०१५-१६ मध्ये ४१९ व २०१६-१७ मध्ये ४१५ हेक्टर शेतीला सिंचन झाले असल्याचे म्हटले आहे. शेरामध्ये मात्र सिंचन क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली नसल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ सिंचन विभागाचे अधिकारी कार्यालयातच राहून आकडे भरत असल्याचे स्पष्ट होत आहे. तलावाच्या खोलीकरणाची व कालव्या दुरूस्तीची आवश्यकता नाही. कमलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व लाभार्थी शेतकरी यांच्या निवेदनानुसार कमलापूर लघू तलावाचे बुडीत क्षेत्रातील खोलीकरणाचे काम २०१७-१८ मध्ये करण्यात येईल. २०१७-१८ चा वर्कप्लॅनमधील दुरूस्ती करून नवीन अंदाजपत्रक बनविण्याचे काम उपविभागीयस्तरावर सुरू असल्याचे पाटबंधारे उपविभाग (सिंचन) चामोर्शीचे सहायक अभियंता श्रेणी १ यांनी कार्यकारी अभियंता चंद्रपूर यांना पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. (वार्ताहर)