सिंचन योजना ठरली शोेभेची
By admin | Published: September 28, 2015 01:44 AM2015-09-28T01:44:57+5:302015-09-28T01:44:57+5:30
तालुक्यातील वेलतूर तुकूम येथे शासनाने लाखो रूपये खर्चून उपसा सिंचन योजना बांधली. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही.
वेलतूर (तुकूम) येथील उपसा योजना : पाच वर्षांपासून सिंचाई विभागाचे होत आहे दुर्लक्ष
चामोर्शी : तालुक्यातील वेलतूर तुकूम येथे शासनाने लाखो रूपये खर्चून उपसा सिंचन योजना बांधली. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या योजनेवर झालेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला असून सदर योजना केवळ शोभेची वस्तू बनली असल्याची टीका वेलतूर (तुकूम) चे सरपंच दिगंबर धानोकर यांनी केली आहे.
वेलतूर तुकूम परिसरात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र जलसिंचनाच्या सुविधेअभावी धानाचे पीक एका पाण्याने करपत होते. गावालगत तलाव असला तरी या तलावाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने शेवटपर्यंत पाणी पुरत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी उपसा सिंचन योजना बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार लघु पाटबंधारे विभागाने या ठिकाणी उपसा सिंचन योजना मंजूर केली. गावाजवळच बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. या नदीचे पाणी तलावामध्ये टाकणे व तलावाचे पाणी नहराच्या माध्यमातून जवळपासच्या शेतीला पोहोचविणे अशी ही योजना होती. या योजनेमुळे परिसरातील अडीचशे ते तिनशे एकर जमिनीला लाभ होणार होता.
शासनाने मंजुरी दिल्यानंतर वैनगंगा नदीवर उपसा सिंचन योजना तयार केली गेली. नदीच्या पात्रात पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचबरोबर काठावर स्वीचरूम बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटूनही सदर योजना सुरू करण्यात आली नाही. या योजनेवर आजपर्यंत लाखो रूपये खर्च करण्यात आले. तरीही या उपसा सिंचन योजनेमुळे धानाची एक बांधीसुध्दा ओलिताखाली आली नाही. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पाणी योजना सुरू करण्याबाबत शेतकऱ्यांनी सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, पाणी वाटप संस्था तयार करा त्यानंतरच योजना सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र अशा प्रकारची संस्था निर्माण न करताच उपसा सिंचन योजना मंजूर कशी केली व कामे कशी पूर्ण केली, असा प्रश्न सरपंच दिगंबर धानोरकर यांनी उपस्थित केला आहे.
यावर्षी या गावातील तलाव अर्धवटच भरला आहे. त्यामुळे एका पाण्याने धानपीक करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाअभावी धान पिकाच्या रोवणीला उशिर झाला आहे. उपसा सिंचन योजना सुरू झाली असती तर रोवण्याची कामे अगदी वेळेवर होऊन शेतकऱ्यांना थोडेफार अधिकचे उत्पन्न झाले असते. सदर योजनेकडे आमदारांनी लक्ष घालून योजना सुरू करण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)