अहेरीतील पाणीपुरवठा सुरू
By admin | Published: May 4, 2017 01:30 AM2017-05-04T01:30:16+5:302017-05-04T01:30:16+5:30
अहेरी शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो.
पाणीटंचाई टळली : पोकलँड मशीनने पाण्याचा प्रवाह वळविला
अहेरी : अहेरी शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. प्राणहिता नदीची धार आटल्याने अहेरी शहराचा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद पडला होता. मात्र प्रशासनाने पोकलँड मशीन लावून पाण्याचा प्रवाह नदीच्या दिशेने वळविल्याने अहेरी शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.
यावर्षीच्या उन्हाळ्यात प्राणहिता नदीची पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. नदीमधील पाण्याच्या टाकीजवळील धार आटल्याने इनटेक वेलमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून अहेरी शहरातील पाणीपुरवठा बंद झाला होता. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची ओरड प्रचंड प्रमाणात वाढली होती. हातपंप व विहिरींवर पाणी भरणाऱ्या महिलांची गर्दी उसळली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत अगदी दुसऱ्याच दिवशी पोकलँड मशीनच्या सहाय्याने पाण्याचा प्रवाह टाकीच्या दिशेने वळविला. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधून पाण्याचा प्रवाह टाकीच्या दिशेने वळविला आहे.
सदर कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे बल्लापूर येथील उपविभागीय अधिकारी सुशील पाटील, कार्यकारी अभियंता संजय वाघ यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता अजय कोतपल्लीवार व तुशार सोनटक्के, अरूण कोंडलेकर यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)