येवलीत हागणदारीमुक्ती करणे हेच मोठे आव्हान
By admin | Published: November 20, 2014 10:52 PM2014-11-20T22:52:20+5:302014-11-20T22:52:20+5:30
चामोर्शी मार्गावर गडचिरोली तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर दिमाखाने उभे असलेले येवली व लगत असलेले गोविंदपूर गाव सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
मिलींद मेडपिलवार - येवली
गडचिरोली- चामोर्शी मार्गावर गडचिरोली तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर दिमाखाने उभे असलेले येवली व लगत असलेले गोविंदपूर गाव सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून देशात खासदार दत्तक ग्राम योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी येवली, गोविंदपूर दत्तक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या गावाची परिस्थिती सध्या कशी आहे, गावाची वाटचाल काय आहे, यासंदर्भात लोकमतने घेतलेला हा आढावा.
या गावाच्या विकासाचा विडा खासदार अशोक नेते यांनी उचलला असला तरी, सर्वात मुख्य आव्हान आहेत ते हे गाव हागणदारीमुक्त करण्याचे. त्यानंतरच या गावाला शुद्ध मुबलक पाणी, गावातील नाल्यांवर स्लॅब टाकून भूमिगत गटार व इतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बराच वाव आहे.
या गावाने यापूर्वीही हागणदारीमुक्तीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी धर्मरावबाबा आत्राम हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र गावात हागणदारीमुक्ती झाली नाही. गावात ७५ वर्ष जुने हनुमान मंदिर आहे. धार्मिक परंपरा जोपासणारे हे गाव असून गावात अनेकांकडे अद्यापही शौचालय नाहीत. गावाचे दोनही रस्ते शौचासाठी मोकळे असल्याने तेथेच सारे विधी उरकले जात होते. मात्र खासदार अशोक नेते यांनी काही दिवसांपूर्वी स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर आता रस्त्याच्या दोनही बाजु आता स्वच्छ झाले आहे. शिवाय कुणीही घाण करतांना सध्यातरी दिसत नाही. दिसल्यास १०० रूपये दंड आकारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
ग्रामपंचायतीने अनेकदा प्रयत्न करूनही यापूर्वी गाव हागणदारीमुक्त होऊ शकले नाही. गावाच्या सीमेवर शौचालयास बसल्यास दंड आकारण्यात येईल, हा फलक दिमाखाने उभा आहे. मात्र शौचालयास बसणाऱ्यांना अद्याप शौचालय बांधावे अशी इच्छा झाली नसल्याने ६० टक्के लोक शौचालय नसलेले आहेत. या गावात माजी खासदार मारोतराव कोवासे व विधान परिषदेचे तत्कालीन सदस्य नितीन गडकरी यांच्या निधीतून काही रस्ते व नाल्याचे बांधकाम करण्यात आले, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली.