शिक्षणातून श्रम हद्दपार करणे ही मोठी चूक; कादंबरीकार राजन गवस यांचे शिक्षण व्यवस्थेवर आसूड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 02:09 PM2023-02-08T14:09:38+5:302023-02-08T14:11:02+5:30
राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले
गडचिरोली : आज शेतकऱ्यांना शेतात राबण्यासाठी मजूर मिळत नाहीत. दुसरीकडे युवा वर्ग रिकामा फिरताना दिसतो. शिक्षणाला श्रमाची जोड देणे गरजेचे आहे, पण आपल्या शिक्षणातून श्रम ही गोष्ट हद्दपार केली, ही सर्वात मोठी चूक आहे. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत, अशा शब्दात ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी शैक्षणिक धोरणावर आसूड ओढले.
गडचिरोलीत दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मंगळवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. अभय बंग, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, तसेच रा.तु.म.नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्रा. प्रमोद मुनघाटे आणि प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे मंचावर विराजमान होते. यावेळी राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले. शिक्षणाच्या व्यवस्थेलाच कॅन्सर झाला आहे, अशा शब्दात त्यांनी आपली खंत व्यक्त केली. खेड्याला मध्यवर्ती ठेवून शिक्षणाचे धोरण राबविले पाहिजे. केवळ अक्षराला ज्ञान समजून निरक्षर आदिवासींना ‘अडाणी’ समजण्याची चूक आपण करून बसलो असल्याचे ते म्हणाले.
पॅकेज महत्त्वाचे, माणुसकी कोण शिकवणार?
आज आपल्या मुलाला किती पॅकेज आहे हे वडील अभिमानाने सांगतात. मुलाला एटीएम मशीन बनविताना त्याला ‘माणूस’ बनायचे शिकवता का? असा परखड सवाल राजन गवस यांनी उपस्थित केला. पूर्वीच्या काळात गोरगरिबांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे शिक्षणमहर्षी होऊन गेले. आता मात्र शिक्षण सम्राट तयार होऊ लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.