चिखलातून गाठावे लागते येडसिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:55 PM2018-08-30T23:55:32+5:302018-08-30T23:56:06+5:30
झिंगानूरपासून सात किमी अंतरावर असलेल्या येडसिली गावाला जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून दुचाकी तर सोडाच बैलबंडी किंवा पायदळ जाणेही कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : झिंगानूरपासून सात किमी अंतरावर असलेल्या येडसिली गावाला जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून दुचाकी तर सोडाच बैलबंडी किंवा पायदळ जाणेही कठीण झाले आहे.
येडसिली हे गाव झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत येते. येडसिली येथे कोणत्याही सुविधा नसल्याने प्रत्येक कामासाठी येथील नागरिकांना झिंगानूर येथेच यावे लागते. झिंगानूर ते येडसिली दरम्यानचा रस्ता जंगलातून जाते. रस्त्याची अवस्था बघितली तर त्याला रस्ता न म्हणता जंगलातील पायवाट असेच संबोधणे योग्य ठरेल, अशी बिकट अवस्था या रस्त्याची झाली आहे.
झिंगानूर ते येडसिली दरम्यानच्या रस्त्यावर खोलगट भाग आहे. या ठिकाणी जंगलातील पाणी जमा होत असून प्रचंड प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. पायदळ व्यक्ती बाजूने जंगलातून जातात. मात्र सायकलस्वार किंवा इतर बैलबंडीला या चिखलातून मार्गक्रमण केल्याशिवाय पर्याय राहत नाही. या गावातील व्यक्ती आजारी पडल्यास झिंगानूर येथे आणावे लागते. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याने सात किमी अंतर खाटेवर बसवून आणल्याशिवाय पर्याय नाही. मार्ग दुरूस्तीबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. रस्त्यांअभावी रुग्ण, गरोदर माता, नवजात बालक यांचा गावातच मृत्यूू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शासनाने रस्त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष घालणे आवश्यक आहे.
१९८३ मध्ये सुरू होती बस
पेंटारामा तलांडी हे आमदार असताना सन १९८२-८३ मध्ये सिरोंचा-आसरअल्ली-कोपेला-झिंगानूर-येडसिली-कल्लेड-देचलीपेठा या मार्गाने बस सुरू होती. याचा अर्थ त्या कालावधीत रस्त्यांची अवस्था चांगली होती. हे स्पष्ट होत आहे. आता मात्र याच रस्त्यांवरून बैलबंडी किंवा सायकलसुद्धा नेणे कठीण झाले आहे. अनेक वर्ष रस्ते दुरूस्ती न झाल्याने ही अवस्था झाली आहे.