हे नदीवरचे पूल की मृत्यूचे सापळे? गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 01:46 PM2020-12-11T13:46:59+5:302020-12-11T13:47:27+5:30
Gadchiroli News हे नदीवरचे पूल की मृत्यूचे सापळे? गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे कठडे वाहून गेले आहेत. कठड्यांअभावी एखादे वाहने नदीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरून जिल्हाभरातील नागरिक नागपूर येथे जातात. त्यामुळे या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. नदीवरील पूल अतिशय जुना आहे. त्यामुळे या पुलावर सिमेंटचे कठडे बांधण्यात आले नाहीत. परिणामी लोखंडी कठडे उभारावे लागतात. यावर्षी वैनगंगा नदीला पूर आला. पुराचे पाणी पुलावर चढल्याने अनेक लोखंडी कठडे वाहून गेले. तर काही कठडे वाकले आहेत. कठडे नसल्याने एखादे वाहन पुलावरून नदीत कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एक युवक नदीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरमोरी शहरातील शेकडो नागरिक पवित्र स्नानासाठी वैनगंगा नदीवर एकत्र येतात. अशावेळी अनुचित प्रकार घडू शकते. त्यामुळे बांधकाम विभागाने कठडे उभारावे, अशी मागणी युवारंग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
काही कठडे वाकले
अनेक वर्षांच्या कालावधीनंतर वैनगंगा नदीवर पुलाचे पाणी चढले. पुराच्या पाण्यामुळे काही कठडे तुटून पुराच्या पाण्यासोबत वाहून गेले. तर काही कठडे वाकले आहेत. त्यांची दुरूस्ती करण्याची गरज आहे. वैनगंगा नदीवरील पूल उंच आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल असल्याने या पुलावरून वाहनांची दिवसरात्र वर्दळ राहते. त्यामुळे कठडे व्यवस्थित असणे आवश्यक आहे.