वनसंपदा अधिक समृद्ध करणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:42 AM2021-09-12T04:42:17+5:302021-09-12T04:42:17+5:30
देसाईगंज : मानवी जीवनात अत्यंत मौलिक भूमिका बजावणाऱ्या वृक्षांची किंमत मानवालाच कळली नसल्याने जंगलांचे अस्तित्व अलीकडे धोक्यात येऊ लागले ...
देसाईगंज : मानवी जीवनात अत्यंत मौलिक भूमिका बजावणाऱ्या वृक्षांची किंमत मानवालाच कळली नसल्याने जंगलांचे अस्तित्व अलीकडे धोक्यात येऊ लागले आहे. दरम्यान, कोरोना कालावधीत गंभीर रुग्णांना ऑक्सिजनच्या गरजेने परत एकदा वृक्षांचे महत्त्व नैसर्गिकरित्या मानवापुढेच ठेवल्याने आपली नैतिक जबाबदारी समजून वन संपदा अधिक समृद्ध करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
वडसा वन विभागाच्यावतीने राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, पुरुषोत्तम भागडकर, किशोर मेश्राम आदी उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे औचित्य साधून वन कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणेच कर्तव्य पार पाडावे लागत असले तरी शहीद वन कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणेच शासकीय स्तरावरुन लाभ देण्यात येत नाही, याकडे आमदारांचे लक्ष वेधण्यात आले असता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही तसेच शहीद स्तंभ उभारण्यासाठी तत्काळ पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार गजबे यांनी दिली.
वन विभागाच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात एकूण १५ वन कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून शहीद वन कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वन अधिकारी रमेश घुटके, प्रास्ताविक सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांनी केले तर भूषण खंडाते यांनी आभार मानले. यावेळी वडसा वन विभागाचे वन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
110921\img_20210911_104745.jpg
राष्ट्रीय वन शहीद दिनी मार्गदर्शन करतांना आमदार क्रिष्णा गजबे.